प्रतिनिधी /बेळगाव
राज्य सरकारच्या आदेशानुसार सोमवार दि. 8 पासून अंगणवाडय़ा खुल्या केल्या जाणार आहेत. जिल्हय़ातील 7 हजार 600 हून अधिक अंगणवाडय़ा सोमवारपासून सुरू होणार असल्याने त्यांची स्वच्छता केली जात आहे. दिवाळीमुळे सलग सुटय़ा असल्यामुळे त्यापूर्वीच स्वच्छतेचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
कोरोनाची स्थिती काहीशी सुधारल्यानंतर शिक्षण विभागाने शाळा-महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला. प्राथमिक शाळा 25 ऑक्टोबरपासून सुरू केल्यानंतर अंगणवाडय़ा केव्हा सुरू होणार याबद्दल साशंकता होती. परंतु 8 नोव्हेंबरपासून राज्यातील बालवाडय़ा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
बेळगाव जिल्हय़ात 7 हजार 600 हून अधिक अंगणवाडय़ा आहेत. त्यामध्ये अंगणवाडी सेविका व साहायिका अशा 14 हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. कोरोनाकाळातही अंगणवाडी सेविका व हेल्पर यांनी सेवा दिली आहे. त्यामुळे अंगणवाडय़ा सुरू असल्यातरी विद्यार्थी मात्र अंगणवाडीपर्यंत येत नव्हते. सोमवारपासून तब्बल 20 महिन्यांनंतर विद्यार्थ्यांचा किलबिलाट अंगणवाडीमध्ये ऐकू येणार आहे.









