प्रतिनिधी/ रत्नागिरी
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत रत्नागिरी व सिंधुदूर्ग या दोन्ही जिल्ह्य़ात आरोग्य यंत्रणेमार्फत घरोघरी तपासणीचे काम युद्धपातळीवर व चांगल्या पध्दतीने सुरू आहे. कोरोना प्रतिबंधासाठी मास्क वापरणे, हात स्वच्छ धुणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे या त्रिसूत्रीची अमंलबजावणीची होताना मास्क वापरणे बंधनकारक आहे. मास्क न वापरल्यास दंडाची कारवाई होईलच पण वारंवार त्याकडे दुर्लक्ष करणाऱयांवर पोलीस कारवाई करण्याच्या सक्त सूचना प्रशासनासोबतच्या बैठकीत देण्यात आल्याचे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिल्या आहेत.
माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गंत शुक्रवारी मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली कोकणातील जिल्ह्य़ांची आढावा बैठक झाली. त्यामध्ये रत्नागिरी व सिंधुदूर्ग या दोन्ही जिल्हय़ांची ही मोहिम राबवण्यात आघाडी घेतली आहे. रत्नागिरी जिल्हय़ाचा आढावा घेता आतापर्यंत 42 हजार कोरोनाच्या चाचण्या झाल्या आहेत. त्यामध्ये 7 हजार 114 पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आहे. जिल्ह्य़ात सुमारे 81 टक्के इतके हे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण असून मृत्यूदरही साडेतीन टक्क्याच्या खाली आला असल्याचे सामंत यांनी सांगितले आहे.
कोव्हीड प्रतिबंधासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय व आरोग्य यंत्रणा चांगले काम करत आहे. या यंत्रणेची कोव्हीडसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. त्यामध्ये माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना उपस्थित सर्व विभागाच्या अधिकाऱयांना करण्यात आल्या आहेत. या मोहिमेत प्रामुख्याने मास्क वापरणे, हात धुणे व सोशल डिस्टन्सिंग ठेवणे या त्रिसूत्री असल्याचे मंत्री सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यावेळी मास्क वापरण्याबाबत लोकांमध्ये सजगता जागृत व्हावी. जो मास्क वापरणार नाही त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि जर एकदा कारवाई होऊनही वारंवार त्याबाबत बेफिकीरी दाखवत असेल तर त्यांच्यावर पोलीस कारवाई करावी अशा सक्त सूचना या बैठकीत केल्याचे सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
रत्नागिरी जिल्ह्य़ात 4 लाख 30 हजार घरे असून त्यांची लोकसंख्या 15 हजार इतकी आहे. या लोकसंख्येला प्रत्येकी 2 मास्क व प्रत्येक घरात सॅनिटायझर देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सामंत यांनी सांगितले आहे. दिले जाणारे मास्क हे वॉशेबल राहणार आहेत. त्यामुळे फार मोठी मोहिम जिल्हय़ात राबवण्यावर भर दिला जात आहे. आतापर्यंत 32 टक्के लोकांची तपासणी झाली असल्याची माहिती दिली. सर्वानी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून या मोहिमेकडे पहावे असे आवाहनही त्यांनी केले. जिह्यात ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत असून त्यासाठी 677 टीम कार्यरत आहेत.
आयटीआयचे कोव्हीड सेंटर बंद होणार नाही
रत्नागिरीत आयटीआयमध्ये महिला वसतीगृहात असलेले कोव्हीड सेंटर अन्यत्र हलविण्याबाबत जोरदार चर्चा होत आहे. त्याबाबत आपण प्रशासनाकडून माहिती घेतली जाईल. पण त्याठिकाणी सुरू असलेले कोव्हीडसेंटर रुग्णांचे हित लक्षात घेता बंद केले जाणार नसल्याचे सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. कोव्हीड योध्दे असलेल्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱयांचे वेतन प्रलंबित राहिले आहे. त्याबाबत आरोग्य विभागातील अधिकारी ठोंबरे यांच्याशी आपण चर्चा केली आहे. येत्या मंगळवारपर्यंत याप्रश्नी योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना करण्यात आल्याचे सांगितले. जिल्हय़ाला आवश्यक असलेल्या रुग्णवाहिकांबाबतही येत्या सोमवारपर्यंत शासनाकडून जीआर निघतील त्यानंतर रुग्णवाहिका येण्यासाठी कार्यवाही होणार आहे.
रत्नागिरीत ऑक्सीजन प्लॅन उभारण्याबाबत विचारविनीमय
रत्नागिरी जिल्ह्य़ात कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आवश्यक असलेला ऑक्सीजन आणण्यासाठी रायगडमधून प्रशासनामार्फत सहकार्य घेतले जात आहे. प्रतिदिन 150 ते 200 मोठे सिलेंडर ची गरज भासत असल्याचे आरोग्य यंत्रणेचे म्हणणे आहे. सध्या जिल्हय़ासाठी ऑक्सीजनचा पुरेशा प्रमाणात पुरवठा होत आहे. पण ऑक्सीजन पुरवठा प्लॅन्ट रत्नागिरीत होण्यासाठी विचारविनिमय सुरू असल्याचे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.









