सातारा / प्रतिनिधी :
महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शासनातर्फे विविध उपाययोजना राबविल्या जातात. याच धर्तीवर आता जिल्ह्यात सर्वत्र सॅनिटरी नॅपकीन एटीएम मशिन बसविण्यात येणार आहे. या मशिनद्वारे अगदी अत्यल्प दरात (2 ते 5 रूपये) हे नॅपकीन उपलब्ध होणार आहे. यापूर्वी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती अंतर्गत सॅनिटरी नॅपकीन डिसपोझल मशिन बसविण्यात आले होते. त्याचधर्तीवर सॅनिटरी नॅपकीन एटीएम मशिन बसविण्यात येणार आहे.
जिल्हा नाविण्यपूर्ण योजनेअंतर्गत सदर एटीएम मशिन बसविण्याचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. ही मशिन जिल्ह्यातील 71 आरोग्य केंद्रे आणि 400 उपकेंद्रांमध्ये बसविण्यात येणार आहेत. याचबरोबर जिल्ह्यातील इयत्ता 5 वी वयोगटापुढील शिक्षण घेणाऱ्या एकुण 1 लाख 22 हजार 14 विद्यार्थीनींकरीता जिल्हय़ातील इयत्ता 5 वी ते 12 पर्यंतच्या एकुण 978 शाळांमध्ये देखील हे मशिन बसविण्यात येणार आहे. याचबरोबर अडीच हजारापुढे लोकसंख्या असलेल्या एकुण 267 ग्रामीण भागांमध्ये ही सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.