अचूक बातमी “तरुण भारत”ची, बुधवार, 7 जुलै 2021, सकाळी 9.15
● पॉझिटिव्हीटी रेट 11.15 वर ● एकूण तपासण्या 10 हजार 495 ● कराड तालुक्यात दहा दिवसात वाढले 2409 रूग्ण ● सातारा तालुक्यातही वाढ कायम ● एकूण उपचारार्थ रूग्णसंंख्या 9493 वर
सातारा / प्रतिनिधी :
लॉकडाऊनच्या निर्बंधाना वाढता विरोध, कोरोनाच्या पॉझिटिव्हीटीचा चढ-उतार, तिसरी लाट येण्याची भिती आणि लसीकरणाचा उडालेला गोंधळ या अस्वस्थेत प्रत्येक जिल्हावासिय अडकला आहे. दिवसेंदिवस ही अस्वस्थता वाढत चालली असतानाच कराड आणि सातारा तालुक्यात कोरोना रूग्णवाढ आटोक्यात ठेवण्यात आलेले अपयश लपून रहात नाही. एकट्या कराड तालुुक्यात दहा दिवसात 2409 रूग्णांची वाढ झाली आहे तर सातारा तालुक्यात 1820 रूग्ण वाढले आहे. त्यामुळे कराड तालुका पुन्हा एकदा कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. दरम्यान गेल्या 24 तासात 1170 वर पोहचला असून, या आकड्याने पॉझिटिव्हीटी रेट 11.15 झाला आहे. दरम्यान जुलैच्या पहिल्या आठवड्यातील हा सर्वाधिक आकडा आहे.
कराड तालुक्यात सुपरस्प्रेड?
कराड तालुक्यात गेल्या 26 जून पासून 6 जुलैपर्यंत 2409 रूग्णांंची वाढ झाली आहे. यामधे 30 जूनचा 188 रूग्णांचा व 5 जुलैचा 184 रूग्णवाढीचा आकडा वगळता इतर आठ दिवसात रूग्णवाढ 250 च्या आसपासच आहे. 1 जुलैला तब्बल 339 रूग्ण तर 3 जुलैला 303 रूग्णांची वाढ एकट्या कराड तालुक्यात झाली आहे. कराड तालुक्यातील रूग्णवाढ 250 खाली आणण्याचे आव्हान जसे प्रशासनासमोर आहे तसेच ही वाढ का झाली या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची गरज आहे.
सातारा तालुका नियंत्रणात, इतर तालुकेही आवाक्यात
कराड तालुक्यात रूग्णवाढ वेगाने का होतेय याची वास्तववादी कारणे प्रशासनाला आणि जनतेलाही चांगलीच माहिती आहेत. मात्र त्याचे खापर व्यापारी वर्गावर फोडले जात असल्याची अस्वस्थ प्रतिक्रिया आहे. त्या तुलनेत सातारा तालुक्यातील रूग्णवाढ नियंत्रणात येताना दिसत आहे. गेल्या दहा दिवसात 26 जून रोजी सर्वाधिक 224 रूग्णांची वाढ झाली होती. त्यानंतर ही वाढ कमी होत गेली. 2 जुलै रोजी तालुक्यात दहा दिवसातील कमी 134 रूग्ण वाढले आहेत. दहा दिवसात तालुक्यात 1820 रूग्णांची वाढ झाली आहे. त्याबरोबरच फलटण,माण, खटाव, वाई, कोरेगाव हे तालुकेही दोन आकड्यांवर आले आहेत.
व्यापारी अस्वस्थ, प्रशासन हतबल
वाढलेल्या निर्बंधामुळे व्यापारी, व्यावसायिक, कष्टकरी प्रचंड अस्वस्थ आहेत. प्रशासनाला निवेदन देऊन ते आता सोशल मिडीयाच्या माध्यमातून आपल्या व्यथा मांडत आहेत. शिवाय खासदार, आमदारांसमोर आपली गार्हाणी मांडत आहेत. एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे प्रशासन पुरते हतबल झाले आहे. लसीकरणाचा वेग अपेक्षित वाढेना, रूग्णवाढीचा आकडा कमी होईना, पॉझिटिव्हीटीच्या चढ-उताराचा खेळ दर आठवड्याला सुरूच आहे. या कात्रीत सापडलेल्या प्रशासनाला आता व्यापारी, व्यावसायिकांसह जिल्हावासियांच्या अस्वस्थ आक्रमकतेला सामोरे जावे लागत आहे. यातून नेमके काय निष्पन्न होणार याकडे प्रत्येक जिल्हावासिय अत्यंत तळमळीने डोळे लावून बसला आहे.
मंगळवारपर्यंत जिल्हय़ात एकूण नमूने 11,23,596, एकूण बाधित 1,99508, एकूण कोरोनामुक्त 1,85,820, मृत्यू 4,794, उपचारार्थ रुग्ण 9493
मंगळवारी जिल्हय़ात बाधित 1170, मुक्त 1,451, बळी 26









