आजी-माजी मुख्याध्यापकांचा सहभाग
प्रतिनिधी / ओरोस:
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी व समाजाप्रती असलेले उत्तरदायित्व म्हणून सिंधुदुर्ग माध्यमिक शाळा आजी-माजी मुख्याध्यापकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत आपले एक दिवसाचे वेतन जमा केले आहे. एकूण सहा लाख 15 हजार 673 रुपये जमा केले असल्याचे पत्र निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्याकडे संघटनेचे अध्यक्ष वामन तर्फे आणि सचिव गुरुदास कुसगावकर यांनी दिले.
सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्यावतीने आपले एक दिवसाचे वेतन कोरोना उपाययोजनांसाठी देण्याचे आवाहन करण्यात आले होते. पाच लाख रुपये देणार असल्याचे जाहीरही करण्यात आले होते. मात्र, याला चांगला प्रतिसाद मिळाला असून काही माजी मुख्याध्यापक, मराठी व इंग्रजी माध्यमाच्या कायम विनाअनुदानित शाळांच्या मुख्याध्यापकांनी ही योगदान दिले असल्याची माहिती मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे यांनी दिली.
आतापर्यंत एकूण 180 शाळांच्या मुख्याध्यापकांनी ऑनलाईन पद्धतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत थेट रक्कम जमा केली आहे. उर्वरित मुख्याध्यापक आपले एक दिवसांचे वेतन लवकरच वर्ग करतील, असा विश्वासही अध्यक्ष व सचिव यांनी व्यक्त केला आहे.









