प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
महाराष्ट्र राज्य स्थापनेला 1 मे 2020 रोजी 60 वर्षे पूर्ण होत आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी यावर्षी महाराष्ट्र राज्यस्थापनेचा वर्धापन दिन अत्यंत साधेपणाने साजरा केला जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणीच फक्त ध्वजारोहण कार्यक्रम केला जाणार आहे. जिल्हय़ात अन्य कुठेही ध्वजारोहणाचा कार्यक्रम केला जाणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे.
1 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. परंतु कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्य शासनाने फक्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी संपूर्ण राज्यात एकाचवेळी सकाळी 8 वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम करण्याचे निर्देश दिले आहेत. या ध्वजारोहण कार्यक्रमाला जिल्हय़ाचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एवढेच उपस्थित राहणार आहेत. या व्यतिरिक्त अधिकारी, कर्मचारी किंवा लोकप्रतिनिधी यांना उपस्थित राहता येणार नाही. जिल्हय़ात शासकीय कार्यालये, शाळा किंवा अन्य कुठल्याही ठिकाणी वर्धापन दिन साजरा करण्यात येऊ नये, असे निर्देश दिले आहेत. अशी माहिती जिल्हाधिकाऱयांनी दिली आहे.









