मुतगा ग्राम पंचायतमध्ये सुनील अष्टेकर यांनी दाखविला हिसका
प्रतिनिधी/ बेळगाव
सीमाभागामध्ये मोठय़ा प्रमाणात मराठी भाषिक राहतात. त्यांना त्यांच्या भाषेतच सर्व परिपत्रके देणे बंधनकारक आहे. असे असताना कायदा पायदळी तुडवत चक्क ग्राम पंचायत निवडणुकीची कागदपत्रे देखील कन्नडमध्येच उपलब्ध करण्यात आली आहेत. त्यामुळे त्याला जोरदार विरोध करण्यात आला आहे. तरी देखील कन्नडमध्येच अर्ज द्या, असा आग्रह सुरू असताना तालुका पंचायत सदस्य सुनील अष्टेकर यांनी मुतगा ग्राम पंचायतमध्ये असणाऱया निवडणूक अधिकाऱयांना चांगलेच धारेवर धरले. त्यामुळे मराठीतच अर्ज स्वीकारले गेले.
लोकशाहीमध्ये कायद्यानेच प्रत्येकाला हा अधिकार दिला आहे. मात्र मराठी भाषिक व सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करुन कन्नडसाठी आटापिटा सुरू आहे. मात्र तीव्र विरोध केला तरच सर्व कागदपत्रे मराठीतून दिली जाणार आहेत. तसेच अर्जही स्वीकारले जाणार आहेत. त्यासाठी आता लोकप्रतिनिधींनीच पुढे येणे ही काळाची गरज बनली आहे. केवळ विरोध करुन चालणार नाही तर त्यांना जाब विचारण्याची गरज आहे.
मंगळवारी तालुका पंचायत सदस्य सुनील अष्टेकर हे मुतगा ग्राम पंचायतमधील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना घेवून अर्ज भरण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथे असलेल्या निवडणूक अधिकाऱयांनी कन्नडमध्ये अर्ज द्या, असे सांगितले. मात्र आम्हाला कन्नड येत नाही. आम्ही मराठी भाषिक असून आमच्या भाषेतच आम्ही अर्ज देणार तुम्ही स्वीकारा अन्यथा नकार द्या, असे सुनावले. तरी देखील आम्हाला कन्नडमध्येच अर्ज द्यावा लागणार असा आग्रह धरला. त्यामुळे सुनील अष्टेकर यांनी तसे तुम्ही लेखी लिहून द्या, असे सांगताच अधिकारी चांगलेच अडचणीत आले. त्यामुळे तातडीने ते अर्ज स्वीकारले गेले. मुतगा ग्राम पंचायतमध्ये तालुका पंचायत सदस्यांनी हिसका दाखविल्यामुळे सत्य काय आहे ते बाहेर पडले. तेव्हा आता इतर ग्राम पंचायतमध्येही आग्रह धरुन मराठीतूनच अर्ज भरणे गरजेचे आहे. निवडणुका या लोकशाहीच्या माध्यमातून घेतल्या जातात. प्रत्येकाला आपल्या भाषेतूनच कागदपत्रे दिल्यास ती समजणार आहेत. मात्र कर्नाटकामध्ये अशा प्रकारे दमदाटी व दडपशाही वारंवार होत असल्याचे दिसून येत असून याकडे आता गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
या प्रकारानंतर संबंधित निवडणूक अधिकाऱयांनी वरि÷ अधिकाऱयांशी संपर्क साधून अर्ज मराठीतून स्वीकारले तर चालेल का? असे विचारले. त्यावर तहसीलदारांनी मराठीतून अर्ज स्वीकारा असे त्या अधिकाऱयाला सांगितले. त्यानंतर सुनील अष्टेकर यांनीही तहसीलदार आर. के. कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता तहसीलदारांनी मराठीतून अर्ज दिल्यास आम्ही स्वीकारु असे सांगितले आहे.









