ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. तत्पूर्वीच एक चांगली बातमी समोर आली आहे. जानेवारी महिन्यात 1.38 लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले आहे. हा आकडा मागील वर्षीच्या जानेवारीच्या तुलनेत 15 टक्क्यांनी अधिक आहे. तसेच सलग चौथ्या महिन्यात जीएसटी संकलनातून 1.30 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळाला आहे.
सोमवारी संध्याकाळी अर्थमंत्रालयाने जीएसटीतून मिळालेल्या महसुलाचा आकडा जाहीर केला. त्यानुसार जानेवारी 2022 मध्ये 1 लाख 38 हजार 394 कोटी रुपये महसूल जीएसटीच्या माध्यमातून मिळाला आहे. जानेवारी 2021 च्या तुलनेत महसुलात 15 टक्क्यांची वाढ झाली आहे. एप्रिल 2021 मध्ये 1 लाख 39 हजार 708 कोटी रुपये महसूल मिळाला होता. जानेवारीमध्ये जीएसटी संकलनात सीजीएसटीचा हिस्सा 24,674 कोटी रुपये आहे. याशिवाय राज्य जीएसटी म्हणून सरकारला 32,016 कोटी रुपये मिळाले आहेत. त्याच वेळी आयजीएसटी म्हणून एकूण 72,030 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत.
जीएसटी संकलनाची ही बातमी उत्साहवर्धक आहे. त्यामुळे आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांकडून काही मोठय़ा घोषणा केल्या जाऊ शकतात, असे जाणकारांकडून सांगण्यात येते.









