प्रतिनिधी /बेळगाव
जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत बेळगाव ग्रामीण पोलिसांनी चौघा जणांवर गुन्हा दाखल केला होता. त्या चौघांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. परशराम सीताराम कुडचीकर, जयवंत भीमराव साळुंके, निखील रमेश कडोलकर तिघेही राहणार हिंडलगा आणि विनय विलास कदम रा. मण्णूर अशी जामीन मिळालेल्यांची नावे आहेत.
ईद सणावेळी सोमनाथनगर ते बॉक्साईट रोडवरून दि. 21 नोव्हेंबर 2018 रोजी मिरवणूक काढण्यात येत होती. यावेळी यश प्रकाश सातेरीकर या तरुणाने हातात भगवा घेऊन फिरविला होता. त्यानंतर वरील चौघांनी त्याचा सत्कार करून त्याची मिरवणूक काढली. यावेळी फिर्यादी महंमद शरिफ सिकंदर रत्नागिरी यांच्या घरावर दगडफेक केल्याचा आरोप करण्यात आला. हा प्रकार जातीय तेढ निर्माण करण्याचा आहे, म्हणून बेळगाव ग्रामीण पोलिसांनी वरील चौघांवर गुन्हा दाखल केला होता.
याप्रकरणी जेएमएफसी द्वितीय न्यायालयात त्यांच्यावर चार्जशीट दाखल करण्यात आली होती. त्यानंतर वरील चौघांनी जामीनसाठी अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर बुधवारी सुनावणी झाली. 50 हजार रुपयाचे वैयक्तिक हमीपत्र आणि तितक्मयाच रकमेचा एक जामीनदार या अटींवर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
या खटल्यात चौघा संशयितांच्यावतीने ऍड. नामदेव मोरे हे काम पहात आहेत.









