आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राची मान उंचावली
वार्ताहर/ औंध
जागतिक कुस्ती संघटनेने नुकत्याच जाहीर केलेल्या जागतिक क्रमवारी यादीत महाराष्ट्राचा अव्वल मल्ल जागतिक पदक विजेता राहूल आवारे याने आपले दुसरे स्थान कायम राखले आहे.
राहूलने परिश्रमपूर्वक कष्ट घेऊन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक पदकांना गवसणी घालून कुस्ती क्षेत्रात देशाची आणि महाराष्ट्राची मान उंचावली आहे. गेल्या वर्षी जागतिक क्रमवारीत तो सहाव्या स्थानावर होता. परंतु जागतिक कुस्ती स्पर्धेत फ्रिस्टाईल प्रकारात राहुलने 61 किलो वजनगटात कास्यपदक मिळवले होते. जागतिक कुस्ती स्पर्धेत पदक मिळवणारा तो महाराष्ट्रातील एकमेव मल्ल आहे. जागतिक पातळीवर कास्यपदक मिळवल्याने त्याने सहाव्या स्थानावरून थेट दुसऱया स्थानावर. झेप घेतली होती.
बुधवारी जाहीर झालेल्या जागतिक क्रमवारीतही 41 गुणासह त्याने दुसरे स्थान कायम राखले आहे. या क्रमवारी जॉर्जियाचा लोमताझदे 78 गुण घेऊन अव्वल स्थानावर आहे.
रशियाचा इंद्रीसोव्ह 40 गुणासह तिसऱया तर युएसएचा टी ग्राफ 38 गुणासह चौथ्या स्थानी आहे. गेल्या महिन्यात दिल्ली येथे झालेल्या आशियाई चॅम्पियनशिपमध्येही त्याने 61 किलो वजनगटात देशाला कास्यपदक मिळवून दिले आहे. सध्या तो नाशिक येथे पोलीस उपअधिक्षक पदाचे प्रशिक्षण घेत आहे. कुस्ती क्षेत्रातील तरुणांचा आयडॉल असलेल्या राहुलच्या दैदिप्यमान कामगिरी मुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राची मान उंचावली असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.









