वाई / प्रतिनिधी :
वाई तालुक्यातील जांभुळणे गावाच्या डोंगरात एक अपरिचित लेणी उजेडात आली असल्याची माहिती भटकंती सह्याद्री परिवाराचे रोहित मुंगसे यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली.
मुंगसे म्हणाले, वाई प्रांताचा पहारेकरी म्हणून ओळखला जाणारा किल्ले वैराटगड ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचा आहे. पन्हाळ्याच्या शिलाहार राजा दुसरा भोज याने 12 व्या शतकात या किल्ल्याची निर्मिती केली. किल्ल्याच्या उत्तर बाजूला असलेल्या 5 पाण्याच्या टाक्यावरून गडाचे प्राचीनत्व सिद्ध होते. गडाच्या पश्चिम बाजूला डोंगरातचं जांभुळणे नावाचं गाव आहे. बहुदा हे गाव शिवकाळात गडाच्या सुरक्षितेसाठी मेट म्हणून वसवले गेलं असावे. या जांभुळणे गावाच्याखाली मध्य डोंगरात एक लेणी कोरलेली आहे. या लेणीला खालच्या बाजूने येण्यासाठी व्याजवाडीच्या शेलारवाडी गावातून वाट आहे. ही लेणी डोंगराच्या मध्यावर कातळ कड्यात कोरलेली असून आडबाजूला असल्याने सहसा नजरेत येत नाही.
ही लेणी खोली स्वरूपाची असून, दर्शनी भागात दगडात आयताकृती दरवाजा कोरलेला आहे. लेणीच्या दरवाजावर दगडात कोरलेल्या खाचा दिसतात. त्या खाचा कोरण्या मागचे कारण म्हणजे, पूर्वीच्या काळी जंगलातील हिंस्त्र श्वापदांपासून बचाव होण्यासाठी, लेणीच्या दरवाजावर लाकडी चौकट दाब जोडणी (प्रेस फिट) पद्धतीने दगडी खाचांमध्ये अडकवून बसवली जात. चौकटीला लाकडी दरवाजा बसवत असे. त्यामुळे लेणीच्या आतमध्ये असणारा मनुष्य सुरक्षित राहत असे. लेणीच्या दरवाजाचे माप उंची ६ फूट ६ इंच x रुंदी २ फूट ४ इंच आहे. उजव्या बाजूला वातानुकूलितासाठी व प्रकाशासाठी खिडकी कोरलेली दिसते. खिडकीचे माप उंची १ फूट x रुंदी १ फूट ३ इंच आहे. लेणीत प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला कातळात आयताकृती बाक कोरलेला आहे. या बाकाचे माप उंची ३ फूट ८ इंच x लांबी ६ फूट १० इंच x रुंदी १ फूट ८ इंच आहे. संपूर्ण लेणीचे माप उंची ६ फूट ६ इंच x लांबी ७ फूट २ इंच x रुंदी ९ फूट ७ इंच आहे. या लेणीची रचना पाहता हे एक भिख्खू निवासस्थान असावं. पूर्वीच्या काळी भिख्खू लोक वर्षावासासाठी अशा लेण्यांचा वापर ध्यानधारणा आणि राहण्यासाठी करत.
वाईच्या आसपास असलेल्या पालपेश्वर, पांडवगड, सोनजाई, कडजुबाई या लेण्यांमध्ये असलेल्या भिख्खू निवासस्थाना सारखीच याची रचना आहे. ही लेणी बौद्ध थेरवाद (हीनयान) पंथातील असून सातवाहन काळात इसवी सन तिसऱ्या किंवा चौथ्या शतकात कोरली गेली असावी. लेणीच्या आसपास पाण्याच्या पोढ्या आणि अन्य काही लेण्या सापडू शकतात. ही लेणी श्री वैराटेश्वर प्रतिष्ठान, किल्ले वैराटगड प्रांत यांनी उजेडात आणली असून लेणीच्या स्वच्छतेसाठी ते लवकरच मोहीम घेणार आहेत. वाई परिसरात अजून एक लेणी नव्याने उजेडात आल्यामुळे लेणी अभ्यासात अजून एक नवीन भर पडलेली आहे. अशाच लेण्या आणि अन्य ऐतिहासिक ठिकाणे उजेडात येत राहिल्याने, वाई परिसराचे पुरातन काळातील ऐतिहासिक महत्व ठळकपणे अधोरेखित होईल. त्यामुळे पुरातन काळातील वाई परिसराचा अभ्यास करणे सोप्पे होईल हे नक्कीच, असे त्यांनी सांगितले.