प्रतिनिधी/ बेळगाव
गोव्यावरुन बेळगावकडे गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती जिल्हा गुन्हे अन्वेशन विभागाला मिळाली. त्यानंतर सापळा रचून जांबोटी (ता. खानापूर) जवळ विक्रीसाठी आणि खरेदीसाठी आलेल्या चार जणांना अटक करण्यात आली आहे. गांजासह रिक्षा व दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
या प्रकरणी अय्याज शरीफ सौदागर (वय 33, रा. रुक्मिणीनगर, बेळगाव), इब्राहिम मुल्ला (वय 26, रा. आझादनगर), नियाजअहमद शपीअहम्मद नायकवाडी (वय 37, रा. अशोकनगर), इम्रान काशिम मुल्ला (वय 33, रा. शिवाजीनगर, बेळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
हे सर्व जण गांजा खरेदी करण्यासाठी जांबोटीकडे जात होते. रिक्षा आणि हिरोहोंडा मोटार सायकल घेवून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर धाड टाकून त्यांच्याकडील 2 किलो 100 ग्रॅम गांजा जप्त केला. या गांजाची किंमत जवळपास 42 हजार रुपये आहे. याचबरोबर ऑटोरिक्षा, हिरोडोंडा दुचाकी, चार मोबाईलही जप्त करण्यात आले.
जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी आणि अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख अमरनाथ रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विरेश दोडमनी यांच्यासह पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक पी. एस. बजंत्री, हवालदार एस. आर. माळगी, पोलीस कॉन्स्टेबल एम. बी. कांबळी, जी. एस. लमाणी, व्ही. आय. नाईक, ए. नागराज, डी. के. दयाण्णावर यांनी कारवाईत भाग घेतला.









