प्रतिनिधी / मडगाव
कोरोना महामारीमुळे यंदा जांबावलीचा श्री दामबाबाचा गुलाल मर्यादित स्वरूपात होणार आहे. श्री रामनाथ दामोदर देवस्थानचे पदाधिकारी तसेच मठग्रामस्थ हिंदू सभेचे पदाधिकारी आज दुपारी 3.30च्या दरम्यान श्री दामबाबाच्या पालखीवर गुलालाची उधळण करणार आहेत. यंदा भाविकांनी गुलालोत्सवात गर्दी करू नये असे आवाहन देवस्थान समिती तसेच मठग्रामस्थ हिंदू सभे तर्फे या पूर्वीच करण्यात आलेले आहे.
यंदा कोरोनाच्या महामारीमुळे गुलालोत्सव होणार की नाही असे प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. मात्र, देवस्थान समिती व मठग्रामस्थ हिंदू सभेच्या पदाधिकाऱयांनी संयुक्त बैठक घेऊन श्री दामबाबाचा गुलालोत्सव मर्यादित स्वरूपात साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे, आज गुलालोत्सव मर्यादित स्वरूपात साजरा होत आहे. मात्र, मंदिर भाविकांसाठी खुले राहणार असून भाविकांनी गर्दी न करता तसेच कोरोना महामारीच्या सर्व तत्वांचे पालन करून श्रींचे दर्शन घ्यावे असे आवाहन करण्यात आलेले आहे.
दरवर्षी श्री दामबाबाचा गुलालोत्सव मोठय़ा थाटात साजरा व्हायचा. गुलालोत्सवात-शिशिरोत्सवात मठग्रामस्थ हिंदू सभे तर्फे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात होते. मठग्रामातील असंख्य भाविक जवळपास आठ दिवस आपला मुक्काम जांबावलीत करायचे. पण, यंदा कोरोना महामारीमुळे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करणे भाग पडले आहे. गुलालोत्सवाच्या दिवशी श्री दामबाबाचा महाप्रसाद देखील व्हायचा व त्याचा लाभ हजारो भाविक घ्यायचे. पण, यंदा गर्दी टाळण्यासाठी हा महाप्रसाद सुद्धा रद्द करण्यात आलेला आहे.
जांबावलीतील श्री दामबाबाचा गुलालोत्सव म्हणजे भाविकांसाठी एक पर्वणीच असते. दामबाबाच्या गुलालोत्सवा दिवशी संध्याकाळच्या सत्रात मडगावची बाजारपेठ बंद ठेवली जायची. मात्र, यंदा गुलालोत्सव मर्यादित स्वरूपात होत असल्याने बाजारपेठ बंद ठेवली जाणार की नाही हे काल उशिरा पर्यंत स्पष्ट झाले नव्हते.









