वृत्तसंस्था/ मेलबोर्न
ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय पुरूषांच्या वरिष्ठ क्रिकेट संघाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी शनिवारी आपल्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाबरोबर शुक्रवारी झालेल्या बैठकीनंतर लँगरने प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्याची घोषणा केली. लँगरने अलीकडेच डीएसईजी ही नवी मॅनेजमेंट कंपनी सुरु केली असून या कंपनीच्या प्रवक्त्याने लँगरच्या राजीनाम्याची माहिती दिली.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने लँगरचा राजीनामा लगोलग स्वीकारला. मध्यंतरी क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या काही अधिकाऱयांबरोबर लँगरचे मतभेद झाले होते. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या या अधिकाऱयांनी लँगरला पुन्हा प्रशिक्षकपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची सूचना केली होती. पण, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने शुक्रवारी या सर्व घडामोडीचा इन्कार केला आणि सदर मतभेद जाहीर झाले.
2018 साली जस्टीन लँगरची ऑस्ट्रेलियन संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. ऑस्ट्रेलियाचा संघ आता लंकेविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळणार असून त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ पाकच्या दौऱयावर जाणार असून या दौऱयात उभय संघात विविध मालिका खेळविल्या जाणार आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलिया लवकरच नव्या प्रशिक्षकाची नियुक्ती करेल.









