छत्तीसगडमधील सीआरपीएफ तळावरील घटना – तीन जखमींवर उपचार सुरू
सुकमा / वृत्तसंस्था
छत्तीसगडमधील सुकमा जिल्हय़ातील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या कॅम्पमध्ये एका जवानाने आपल्या साथीदारांवर गोळीबार केला. यात चार जवान जागीच ठार झाले. गोळीबारात आणखी तीन जवान जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी जवान सीआरपीएफ 50 बटालियनचे आहेत. सहकाऱयांवर गोळीबार करणाऱया सीआरपीएफच्या 50 बटालियनचे कॉन्स्टेबल रितेश रंजनला त्याच्या शस्त्रासह अटक करण्यात आली आहे. सीआरपीएफने घटनेचे कारण शोधण्यासाठी आणि उपाययोजना सुचवण्यासाठी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले. ही घटना सोमवारी पहाटे 3.25 वाजता घडली.
जवान रितेश रंजनने मरीगुडा पोलीस स्टेशन अंतर्गत लिंगापल्ली येथे तैनात असलेल्या आपल्या सहकारी जवानांवर गोळीबार केला. ज्यामध्ये 7 जखमी जवानांना तातडीने भद्राचलम रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे पोहोचल्यावर चौघांना मृत घोषित करण्यात आले. कॉन्स्टेबल धनाजी, राजीव मंडल, राजमणी कुमार यादव आणि धर्मेंद्र कुमार अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. धनंजय कुमार सिंग, कॉन्स्टेबल धर्मात्मा कुमार आणि मलाय रंजन महाराणा अशी जखमींची नावे आहेत.
‘तो’ हल्लेखोर जवान मानसिकदृष्टय़ा आजारी
आरोपी जवान रितेश रंजन हा नाईट डय़ुटीवर होता. आरोपीने हे भयंकर पाऊल का उचलले याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. तरीही आरोपी जवान रितेश हा मानसिकदृष्टय़ा आजारी असल्याचे स्पष्ट झाले आहे. सीआरपीएफमधील उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रितेश हा मानसिक रुग्ण आहे. मानसिक आजारामुळे त्याच्याकडून रायफलही काढून घेण्यात आली होती. पण, रितेशने दुसऱया जवानाकडील रायफल हिसकावून चार जणांना ठार केल्याचे निदर्शनास आले आहे.
विविध माध्यमातून तपास
यापूर्वीही सीआरपीएफ कॅम्पमध्ये अशा गोळीबाराच्या घटना समोर आल्या आहेत. ही घटना ज्या भागात घडली तो सुकमाचा अगदी अंतर्गत भाग आहे. हल्लेखोर जवान कोणत्याही डिप्रेशनमध्ये होता की त्याच्या सहकाऱयांसोबत वाद झाला होता अशा विविध माध्यमातून तपास केला जात आहे. आरोपी जवानाला ताब्यात घेऊन यंत्रणा चौकशी करत आहेत. ऑपरेशन क्षेत्रातील प्रत्येक जवान संपूर्ण वेळ शस्त्रे सोबत ठेवतो. मात्र, निवडक सायको केसेसमध्ये जवानांना शस्त्रे दिली जात नाहीत. घटनेच्या काल रात्री रितेशचा कोणाशी तरी वाद झाला, त्यानंतरच त्याने दुसऱयाच्या शस्त्राने गोळीबार केल्याचीही चर्चा आहे.









