सुधारित खेळ करूनही भारताचा दुसरा पराभव
वृत्तसंस्था/ टोकियो
भारतीय महिला हॉकी संघाला ऑलिम्पिक स्पर्धेत सलग दुसऱया पराभवाला सामोरे जावे लागले. सोमवारी झालेल्या गट अ मधील सामन्यात रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकलेल्या जर्मनीने भारतावर 2-0 अशी मात केली.
पहिल्या सामन्यात बलाढय़ नेदरलँड्सकडून 1-5 असा दारुण पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय महिलांनी जर्मनीविरुद्धच्या सामन्यात सुधारित प्रदर्शन केले. पण जागतिक क्रमवारीत तिसऱया स्थानावर असणाऱया जर्मनीवर मात करण्यासाठी तेवढे पुरेसे ठरले नाही. भारतीय महिलांनी या सामन्यात अनेक संधी वाया घालवल्या, त्याचाच फटका त्यांना बसला. तिसऱया सत्रात रानी रामपालने पेनल्टी कॉर्नरवर मारलेला फटका अडवताना जर्मनीच्या बचावपटूकडून फाऊल झाल्याने भारताला पेनल्टी स्ट्रोक मिळाला होता. पण गुरजित कौरने तो वाया घालवला. जर्मनीचे गोल निके लॉरेन्झ (12 वे मिनिट) व ऍना स्क्रोडर (35 वे मिनिट) यांनी नोंदवले. जर्मनीचा हा सलग दुसरा विजय असून पहिल्या सामन्यात त्यांनी ग्रेट ब्रिटनवर 2-1 अशा गोलफरकाने मात केली होती. भारताचा पुढील सामना बुधवारी ग्रेट ब्रिटन संघाविरुद्ध होणार आहे.
जर्मनीने आक्रमक सुरुवात करताना नवव्या मिनिटाला गोलपोस्टवर धडक मारली. पण सविताने अप्रतिम गोलरक्षण करून फ्रान्सिस्का हॉकेचा प्रयत्न फोल ठरवला. मात्र तीनच मिनिटानंतर कर्णधार निके लॉरेन्झने जर्मनीला आघाडीवर नेले. त्यांना मिळालेल्या पहिल्या पेनल्टी कॉर्नरवर तिने हा गोल नोंदवला. पूर्वार्धात जर्मनीने जास्त आक्रमक खेळ केला आणि 21 व्या मिनिटाला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळविला. पण यावेळी भारताने अप्रतिम बचाव करून त्यांचा हा प्रयत्न वाया घालविला. भारताने पहिल्या सामन्याच्या तुलनेत येथे उंचावणारा खेळ केला आणि काही वेळा जर्मनीच्या गोलक्षेत्रापर्यंत धडक मारली. मात्र फिनिशिंगमध्ये त्या कमी पडल्या आणि जर्मनीने भक्कम बचावही केल्याने त्यांना यश मिळू शकले नाही. मध्यंतराला भारतीय संघ एक गोलने पिछाडीवर होता.
उत्तरार्धात मात्र भारताने डावपेचात बदल केला आणि आक्रमक खेळावर भर देत जर्मनीवर अनेकदा चढाया केल्या. त्यामुळे जर्मनीला यावेळी बचाव करण्यावरच लक्ष केंद्रित करावे लागले होते. वंदना कटारियाने शानदार खेळ करीत या सामन्यात अनेक संधी निर्माण करून दिल्या. पण आघाडीवीरांना त्याला फिनिशिंग टच देण्यात यश आले नाही. तिसऱया सत्रातील दुसऱया मिनिटाला वंदनानेच भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळवून दिला. रानीने त्यावर मारलेला जोरदार फटका जर्मनीच्या बचावफळीतील खेळाडूच्या शरीराला लागल्याने भारताला पेनल्टी स्ट्रोक मिळाला. यावेळी भारताने रिव्हय़ू घेतला होता. मात्र गुरजित कौरला त्याचा लाभ घेता आला नाही. तिने मारलेला फटका साईड बारला लागल्याने ही सुवर्णसंधी वाया गेली. तीनच मिनिटानंतर स्क्रोडरने शानदार फटका मारत जर्मनीचा दुसरा गोल नोंदवला. भारताने नंतर जोरदार प्रयत्न केले. वंदना दोनदा गोल करण्याच्या नजीक आली होती. पण जर्मनीच्या गोलरक्षकाने एकदा अप्रतिम बचाव केला आणि नवनीतच्या फटक्यावर तिने डिफ्लेक्ट केलेला फटका बारवरून बाहेर गेला. जर्मनीने नंतर चेंडूवर ताबा ठेवत भारताला संधी मिळू दिली नाही आणि दोन गोलांची आघाडी कायम ठेवत विजय साकार केला.









