वृत्तसंस्था / मास्को
भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी शुक्रवारी येथे रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्जी लाव्हरोव्ह यांच्याशी चर्चा केली आहे. ही चर्चा आवकाश, अणुऊर्जा, पारंपारीक ऊर्जा आणि संरक्षण क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमधील संबध अधिक बळकट करण्यासाठी झाली, असे सांगण्यात आले.
जयशंकर गुरुवारपासून रशियाच्या तीन दिवसाच्या दौऱयावर आहेत. रशिया भारताचा सर्वकालिन मित्र देश असून दोन्ही देशांमध्ये मजबूत संबंध आहेत. संरक्षण व इतर क्षेत्रांमध्ये ते अधिकच भक्कम होत आहे. लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्यात वार्षिक शिखर परिषद होणार आहे. या परिषदेची तयारी करण्यासाठी जयशंकर येथे गेले आहेत.
कोरोना काळात सहकार्य
भारत कोरोनाच्या उद्रेकाशी संघर्ष करीत असताना रशियाने मोलाचे सहकार्य केले आहेत. त्याबद्दल जयशंकर यांनी समाधान व्यक्त केले. रशियाची स्पुटनिक लस आता भारतातही वितरीत केली जात आहे. या सहकार्यामुळे दोन्ही देश अधिकच जवळ येत आहेत, असे जयशंकर यांनी प्रतिपादन केले.
तामिळनाडुतील कुडनकुलम येथील अणूऊर्जा प्रकल्पाचे काम सुरळीत सुरु आहे. हा प्रकल्प रशियाच्या सहकार्याने आकाराला येत आहे. रशिया हा भारताचा अगदी प्रारंभापासूनचा भागिदार असल्याने भारताच्या दृष्टीने त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, अशी भलावणही एस. जयशंकर यांनी चर्चेनंतर केली.









