संयुक्त पथकाची कामगिरी, शोध अभियान सुरुच
वृत्तसंस्था/ जम्मू
जम्मू काश्मीरमधील कुलगाम येथे सुरक्षादलाच्या जवानांनी 3 दहशतवाद्यांना ठार मारले आहे. सेनादल, सीआरपीएफ आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कामगिरी केली आहे. तर याआधी कुलगाममधील गुडेर इलाख्यातही चार दहशतवाद्यांना सुरक्षा दलाच्या जवानांनी कंठस्नान घातले आहे. या दोन्ही ठिकाणी अद्यापही शोध अभियान सुरुच असल्याचे संयुक्त पथकाच्यावतीने सांगण्यात आले.
रविवारी मध्यरात्रीनंतर ही चकमक सुरु झाली असून दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांना लक्ष्य करत गोळीबार सुरु केल्याने ही कारवाई करण्यात आली. जम्मू काश्मीर पोलीस, सीआरपीएफ आणि सेनादलाच्या काही तुकडय़ांनी दोन्ही परिसराची संपूर्ण नाकाबंदी करत दहशतवाद्यांना शरण येण्याची संधी दिली. मात्र त्यांनी गोळीबार सुरु केल्यानंतर जवानांनी त्यांना ठार मारले. लॉकडाऊनच्या कालावधीत आतापर्यंत 23 दहशतवाद्यांना ठार करण्यात आल्याचेही अधिकाऱयांनी सांगितले. तर यावर्षभरात आतापर्यंत 50हून अधिक दहशतवादी संपवण्यात आले आहेत. मात्र त्यामुळे पाकिस्तान आणि दहशतवाद्यांची घुसखोरी अधिकच वाढल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, पाकव्याप्त काश्मीरमध्ये किमान 300 दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नात असल्याची माहिती गुप्तचर संस्थांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर सेनादलाने चोख तयारी केली असून घुसखोरी विरोधी आणि दहशतवाद विरोधी रणनिती आखली आहे, असे काश्मीरमध्ये तैनात केलेल्या 15 व्या कोअरचे कमांडर लेफ्टनंट जनरल बी. एस. राजू यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीमारेषेवर गस्त सुरु असताना योग्य ती खबरदारी घेण्यात येत असल्याचे सांगितले. कारण हे घुसखोर कोरोनाबाधित असल्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांच्या मृतदेहांपर्यंत जाताना आणि त्यांची शस्त्रs व इतर वस्तू हाताळताना योग्य खबरादारी घेतली जात असल्याचे राजू यांनी सांगितले.









