सरकारी पी. बी. हायस्कूलमध्ये मतमोजणी : रात्री उशिरापर्यंत चालली मोजणी
वार्ताहर / जमखंडी
तालुक्यातील 24 ग्राम पंचायतींच्या मतमोजणीस येथील सरकारी पी. बी. हायस्कूलमधील 25 खोल्यांतून सकाळी 8 वाजता प्रारंभ करण्यात आला. प्रत्येक खोलीत तीन टेबल्सची सोय करण्यात आली होती. पी. बी. हायस्कूल समोरील मुख्य मार्ग पोलिसांनी बॅरिकेड्स लाऊन बंद केला होता. मतमोजणी रात्री उशिरापर्यंत चालल्याने उमेदवारांसह समर्थक, कार्यकर्त्यांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. सकाळपासून ग्रामीण भागातील जनतेचे लोंढे जमखंडीकडे येत होते. तालुक्यातील 24 ग्रा. पं. च्या 496 जागांपैकी 425 जागांसाठी निवडणूक झाली. सावळगी तालुका केंद्राच्या मागणीसाठी येथील ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार घातल्याने 32 जागांसाठी याठिकाणी मतदान झाले नाही. तर 39 जागा बिनविरोध झाल्या आहेत.
मतमोजणी सुरू असताना अधिकारी अत्यवस्थ
पी. बी. हायस्कूलमध्ये मदरखंडी ग्रा. पं. ची मतमोजणी सुरू असताना निवडणूक अधिकारी प्रा. मल्लप्पा कोप्पद यांना भोवळ आली. लागलीच डॉ. कल्मेश कांबळे यांनी त्यांची वैद्यकीय तपासणी करून प्रा. कोप्पद यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केले. रक्तदाब कमी झाल्याने व ताप असल्याने प्रा. कोप्पद यांना भोवळ आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
समान मते लॉटरी पद्धतीने विजयी घोषित
तालुक्यातील बिदरी ग्राम पंचायत वॉर्ड क्र. 3 चे उमेदवार सदाशिव दोडमनी व सागर हरिजन यांना प्रत्येकी 290 मते मिळाली. त्यामुळे चिठ्ठी काढून उमेदवाराची निवड करण्यात आली. यात सागर हरिजन यांना विजयी घोषित करण्यात आले. असाच प्रकार जिल्हय़ातील गुळेदगुड्ड व इलकल येथे घडला. तुंगळ ग्रा. पं. वॉर्ड क्र. 2 मध्ये महादेवी सावळगी या 2 मताच्या अंतराने विजयी झाल्या. त्यांना 416 तर त्यांच्या प्रतिस्पर्धी कांताबाई हिरेमठ यांना 414 मते मिळाली.
तोदलबागी ग्रा. पं. वॉर्ड क्र. 1 व 5 मधून निवडणूक रिंगणात उतरलेले सिद्राय सायगोंड हे दोन्ही वॉर्डातून विजयी झाले. कोणत्याही राजकीय चिन्हा व्यतिरिक्त निवडणूक असली तरी काँग्रेस व भाजपचे किती उमेदवार विजयी झाले, याची चर्चा होत होती. विजयी उमेदवारांचे समर्थक गुलाची उधळण करून जल्लोष करीत होते.









