भारतीय पारपत्राला यादीत 85 वा क्रमांक
वृत्तसंस्था / न्यूयॉर्क
हेन्ले आणि पार्टनर्सच्या पारपत्र निर्देशांक जागतिक मानांकनात जपानच्या पारपत्राला जगात सर्वात शक्तिशाली ठरविण्यात आले आहे. या यादीत 2020 च्या तुलनेत भारताचे स्थान एक अंकाने घसरून 85 वे झाले आहे. तर पाकिस्तान या यादीत खालून चौथ्या स्थानावर आहे. तर चीनला 70 वे स्थान प्राप्त झाले आहे.
पारपत्रधारक व्हिसाशिवाय किती देशांमध्ये प्रवास करू शकतात यावर त्याचे मानांकन ठरत असते. व्हिसा ऑन अराइव्हलची सुविधा प्रामुख्याने मित्रदेशांकडून दिली जाते. हेन्ले अँड पार्टनर्सच्या पारपत्र निर्देशांकात यंदा पहिल्या तीन स्थानी आशियाई देशांनीच बाजी मारली आहे. यात पहिल्या स्थानी जपान असून त्याच्या नागरिकांना 191 देशांमध्ये व्हिसा ऑन अरायव्हलची सुविधा प्राप्त आहे. तर दुसऱया स्थानावर सिंगापूर असून त्याच्या नागरिकांना 190 देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवेशाची सुविधा मिळालेली आहे. दक्षिण कोरिया आणि जर्मनी संयुक्तपणे तिसऱया स्थानावर आहेत. यात दक्षिण कोरियाच्या नागरिकांना 189 देशांमध्ये व्हिसा ऑन अरायव्हलची सुविधा प्राप्त आहे.
भारताच्या पारपत्राला 58 देशांकडून व्हिसामुक्त प्रवेश मिळतो. भारतासोबत तजाकिस्तानच्या पारपत्रालाही 85 वे स्थान प्राप्त आहे. शक्तिशाली पारपत्राप्रकरणी अमेरिका 5 अन्य देशांसह सातव्या स्थानावर आहे. या देशांमध्ये बेल्जियम, न्यूझीलंड, नॉर्वे, स्वीत्झर्लंड आणि ब्रिटन सामील आहे. अमेरिकेच्या नागरिकांना जगातील 185 देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवेशाची सुविधा मिळालेली आहे.
पारपत्र निर्देशांकात चीनला 70 वे स्थान मिळाले आहे. चीनच्या नागरिकांना जगातील 75 देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवेशाची सुविधा आहे. चीनवर हेरगिरी करण्याचे अनेक गुन्हे नोंद आहेत. याचमुळे आर्थिक शक्ती असूनही चिनी नागरिकांना जगातील अनेक देशांमध्ये व्हिसा मिळविणे अवघड ठरते. तर या यादीत पाकिस्तानची स्थिती अत्यंत दयनीय आहे. जगात दहशतवादाचा पुरवठा करणाऱया पाकिस्तानला या यादीत तळापासून चौथे स्थान प्राप्त आहे. पाकिस्तानी नागरिकांना केवळ 32 देशांमध्येच व्हिसामुक्त प्रवेशाची सुविधा मिळालेली आहे.









