शासनाने आर्थिक मदत करावी – तमाशा कलावंतांची मागणी
प्रतिनिधी / सांगली
दोन वर्ष कोरोना महामारीमुळे झाडाखाली तमाशा करणाऱ्या हंगामी कलावंतांची मोठी उपासमार चालू असल्यामुळे व तमाशा फडही बंद असल्यामुळे कलाकारांचे खूप हाल सुरू आहेत. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नुकतीच सावर्डे ता. तासगाव येथे तमाशा फडमालक व कलाकार यांची बैठक पार पडली.
या बैठकीमध्ये १५० वर्षे पूर्वी महाराष्ट्रात सर्वप्रथम तमाशा फड सुरु करणारे उमा बाबाजी यांचे नावाने ‘ उमा बाबाजी हंगामी तमाशा कलाकार संघटना महाराष्ट्र’ या नावाने संघटनेची स्थापना करण्यात आली. या बैठकीत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून सर्वानुमते भास्कर सदाकळे यांची निवड करण्यात आली. या बैठकीत शासनाने तमाशा कलावंतांना त्वरीत आर्थिक मदत करावी, तसेच वृध्द कलाकारांना पेन्शनसह विविध मागण्यांसाठी तहसीलदार व जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचे ठरले. त्यातच एक भाग म्हणून तासगाव तहसीलदार कचेरीसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
या बैठकीमध्ये अगर नागजकर, सुमनताई खरसुंडीकर, लता लंका पाचेगावकर रेणुकाताई खरसुंडीकर हे फडमालक उपस्थित होते. सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील ५० तमाशा कलावंतही या बैठकीला उपस्थित होते. त्याचबरोबर जिल्हाध्यक्षपदी मंगेश सकट, महिला जिल्हाध्यक्ष पदी सुमनताई खरसुंडीकर, तासगाव तालुका सलीम मुजावर, महिला अध्यक्षपदी लंका कांबळे तर सल्लागार म्हणून डॉ. संपत पार्लेकर, मेजर हनुमंत सदाकळे, भगवान लोंढे हे सल्लागार समितीचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली.








