ऑनलाईन टीम/तरुण भारत
देशभरात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे चित्र जप्ल्पस निश्चित झालं आहे. संपूर्ण निकाल संध्याकाळपर्यंत हाती येणार आहेत. मात्र त्याआधीच भाजपाने चार राज्यांमध्ये तर आपने पंजाबमध्ये बहुमत मिळवले आहे. काँग्रेसचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे. पंजाबमध्ये सत्ता असलेल्या काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री चन्नीसह नवज्योतसिंग सिद्धू यांना पराभव पत्करावा लागला आहे.
दरम्यान, गोव्यात काँग्रेस दुसऱ्या स्थानी आहे. तर उत्तर प्रदेशात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून काँग्रेस बसपाच्याही मागे पडला आहे. या सर्व निकालांनंतर आता खासदार आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.
पाच राज्यांतील काँग्रेसच्या खराब कामगिरीनंतर राहुल गांधी यांनी ट्विट करून विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. जनतेचा निर्णय आम्ही नम्रपणे स्वीकारतो, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. यातून आम्ही शिकू आणि भारतातील लोकांच्या हितासाठी काम करत राहू असंही राहुल गांधींनी म्हटलं आहे.
“जनतेचा निर्णय नम्रपणे स्वीकारा. जिंकणाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा. काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि स्वयंसेवकांचे त्यांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आम्ही यातून शिकू आणि भारतातील लोकांच्या हितासाठी काम करत राहू,” असे राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.