विधान परिषद निवडणूक रणधुमाळी, जनता दलाचे 15 नगरसेवक पाटील यांच्यासोबत
प्रतिनिधी/ कोल्हापूर
विधान परिषदेच्या निवडणुकीत जनता दलाचे जेष्ठ नेते व माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांनी आपल्या गटाचा पाठिंबा पालकमंत्री सतेज पाटील यांना जाहीर केला आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. त्यामुळे मतदारांच्या भेटीगाठी जोरात सुरू आहेत. पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी सकाळी जनता दलाचे जेष्ठ नेते व माजी आमदार ऍड. श्रीपतराव शिंदे यांची निवासस्थानी भेट घेतली. यावेळी नगराध्यक्ष स्वाती कोरी आणि उप नगराध्यक्ष महेश कोरी यांच्यासह 15 नगरसेवकांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत गडहिंग्लज शहरातील विविध विकासकामावर चर्चा झाली. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत सतेज पाटील यांना एकमुखाने बिनशर्त पाठिंबा द्यायचा निर्णय या बैठकीत घेतला. सध्या गडहिंग्लज नगरपालिकेत जनता दलाची सत्ता असून त्यांचे 15 नगरसेवक आहेत. यामुळे पालकमंत्री पाटील यांना भक्कम पाठिंबा मिळाला आहे.
सतेज पाटील यांचा विजय निश्चित
आजपर्यंत ज्या उमेदवारांना आम्ही पाठींबा दिला, त्या सर्वांचा विजय झाला. त्यामुळे जनता दलाचा पाठिंबा म्हणजे सतेज पाटील यांचा विजय ठरलेला आहे, असे यावेळी नगराध्यक्ष स्वाती कोरी यांनी सांगितले.