आयपीएल साखळी सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सचा 45 धावांनी एकतर्फी विजय
मुंबई / वृत्तसंस्था
रविंद्र जडेजा व मोईन अली यांनी राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजीला मोठा सुरुंग लावल्यानंतर चेन्नई सुपरकिंग्सने सोमवारी आयपीएल साखळी सामन्यात 45 धावांनी एकतर्फी विजय संपादन केला. चेन्नईने प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर 9 बाद 188 धावांचा डोंगर रचल्यानंतर प्रत्युत्तरात राजस्थानचा संघ 20 षटकात 9 बाद 143 धावांपर्यंतच मजल मारु शकला.
फॅफ डय़ू प्लेसिस (17 चेंडूत 33), डेव्हॉन ब्रेव्हो (8 चेंडूत नाबाद 20), अम्बाती रायुडू (17 चेंडूत 27), अली (20 चेंडूत 26) यांच्या योगदानामुळे चेन्नईने आव्हानात्मक धावसंख्या उभारल्यानंतर रॉयल्सने जोस बटलरच्या (35 चेंडूत 49) फटकेबाजीसह आक्रमक सुरुवात केली होती. पण, वानखेडेच्या पिचवर नंतर मोईन अली व जडेजाचे अधिराज्य प्रस्थापित झाले आणि पाहता पाहता राजस्थानच्या आव्हानातील जानच निघून गेली.
एकीकडे, मोईन अलीने 3 षटकात 7 धावात 3 बळी घेतले तर दुसरीकडे, जडेजाने 4 षटकात 28 धावात 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. त्याने बटलरची यष्टी उद्ध्वस्त करणारा चेंडू तर अक्षरशः क्लासिक कॅटेगेरीतील होता. सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक असणाऱया जडेजाने या सामन्यात 4 झेलही टिपले. चेन्नईसाठी हा सलग दुसरा विजय आहे. यापूर्वी त्यांनी पंजाब किंग्सचा देखील धुव्वा उडवला होता.
राजस्थान रॉयल्स ः जोस बटलर त्रि. गो. जडेजा 49 (35 चेंडूत 5 चौकार, 2 षटकार), मनन वोहरा झे. जडेजा, गो. करण 14 (11 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), संजू सॅमसन झे. ब्रेव्हो, गो. करण 1 (5 चेंडू), शिवम दुबे पायचीत गो. जडेजा 17 (20 चेंडूत 2 चौकार), डेव्हिड मिलर पायचीत गो. अली 2 (5 चेंडू), रियान पराग झे. जडेजा, गो. अली 3 (7 चेंडू), राहुल तेवातिया झे. गायकवाड, गो. ब्रेव्हो 20 (15 चेंडूत 2 षटकार), ख्रिस मॉरिस झे. जडेजा, गो. अली 0 (2 चेंडू), जयदेव उनादकट झे. जडेजा, गो. ठाकुर 24 (17 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), चेतन साकरिया नाबाद 0 (0 चेंडू), मुस्तफिजूर नाबाद 0 (4 चेंडू). अवांतर 13. एकूण 20 षटकात 9 बाद 143.
गडी बाद होण्याचा क्रम
1-30 (वोहरा, 3.5), 2-45 (सॅमसन, 5.5), 3-87 (बटलर, 11.1), 4-90 (दुबे, 11.6), 5-92 (मिलर, 12.5), 6-95 (रियान, 14.1), 7-95 (मॉरिस, 14.3), 8-137 (तेवातिया, 18.6), 9-143 (उनादकट, 19.2).
गोलंदाजी
दीपक चहर 3-0-32-0, सॅम करण 4-0-24-2, शार्दुल ठाकुर 3-0-20-1, रविंद्र जडेजा 4-0-28-2, डेव्हॉन ब्रेव्हो 3-0-28-1, मोईन अली 3-0-7-3.
सामन्याचा टर्निंग पॉईंट
राजस्थानच्या 6 फलंदाजांना बाद करण्यात जडेजाचा सिंहाचा वाटा!
चेन्नईने राजस्थानला 45 धावांनी नमवले, त्यावेळी अष्टपैलू रविंद्र जडेजाने चक्क 6 प्रतिस्पर्धी फलंदाजांना बाद करण्यात मोलाचा वाटा उचलला. गोलंदाजीत आणि क्षेत्ररक्षणातील योगदानाचा यात महत्त्वाचा वाटा राहिला. त्याने काटेकोर, नियंत्रित टप्प्यावर गोलंदाजी करत 4 षटकात 28 धावात 2 बळी, असे पृथक्करण नोंदवले. त्याने धोकादायक बटलर (49), शिवम दुबे (17) यांचे बळी घेतले. शिवाय, क्षेत्ररक्षणातही कमाल करत त्याने चक्क 4 झेल टिपले. यात मनन वोहरा (14), रियान पराग (3), मॉरिस (0), उनादकट (24) यांचा समावेश राहिला.









