‘भुताटकी’युक्त इमारतीत 25 हजार कब्रं
जॉर्जियात बंद पडलेल्या सेंट्रल स्टेट हॉस्पिटलला आता पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. अनेक वर्षांपर्यंत पडक्या इमारतींचे संशोधक आणि भूत पकडू पाहणाऱयांमध्ये ही इमारत आकर्षणाचे केंद्र ठरली होती. मूळ स्वरुपात याचे नाव ‘जॉर्जिया स्टेट लुनाटिक, इडियट अँड इफिलेप्टिक असायलम’ आहे. हे रुग्णालय 1842 मध्ये सुरू करण्यात आले होते. 1960 च्या दशकापर्यंत 12 हजारांहून अधिक रुग्णांसोबत जगातील सर्वात मोठे रुग्णालय म्हणून ते ओळखले जाऊ लागले.
दुसऱया महायुद्धाचा प्रभाव जगातील अनेक मानसोपचार रुग्णालयांवर झाला. जॉर्जियाचे रुग्णालय सुरू ठेवण्यासाठी निधीची गरज होती. तर कर्मचाऱयांना मानसिक आरोग्याबद्दल फारच कमी माहिती होती. याचमुळे रुग्णांवर क्रूर पद्धतीने उपचार करण्यात आले. अटलांटा नियतकालिकानुसार डॉक्टरांनी त्यावेळी लोबोटॉमी, इन्सुलिन शॉक आणि इलेक्ट्रॉनिक थेरपीचा वापर केला होता.

रुग्णांना यातना
याचबरोबर रुग्णांवर उपचार अनेक क्रूर उपकरणांनी केला जात होता. मुलांना धातूच्या पिंजऱयात कैद ठेवले जायचे. प्रौढांना तप्त आणि थंड पाण्याने आंघोळ करण्यासाठी भाग पाडले जायचे आणि त्यांना स्ट्रेट जॅकेटमध्ये बांधण्यात यायचे. सद्यकाणत रुग्णालयाचा केवळ एक हिस्सा खुला असून 300 रुग्णांवर उपचार केला जातोय.
हजारो जणांची दफनभूमी
काळासोबत रुग्णालयाची स्थिती अत्यंत खराब झाल्याने सुमारे 1 हजार एकरातील रुग्णालयाच्या 200 इमारती जीर्ण झाल्या. रुग्णालय परिसरात सुमारे 25 हजार रुग्णांना दफन करण्यात आले आहे. या परिसरात भूतांचा वावर असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. मागील वर्षी काही पर्यटकांना रुग्णालयाची सैर करविण्यात आली होती.









