अवैध दारू रोखण्यासाठी निर्णय : उत्पादन शुल्क आयुक्तांची माहिती
मोहिमेवरील कर्मचाऱयांवर हल्ला झाल्यास प्रत्युत्तर देणार
दारू वाहतूक रोखण्यासाठी मुळाशी जाऊन तपास
युवकांचा सहभाग रोखण्यासाठी प्रयत्न करणार
प्रतिनिधी / बांदा:
गोवा राज्य सीमेलगत अवैध वाहतुकीसाठी मोकळय़ा असलेल्या वाटा सर्वप्रथम बंद करण्यात येणार आहेत. त्यासाठी कोल्हापूरला जोडणाऱया छुप्या मार्गावर व घाट मार्गावर कायमस्वरुपी वायुवेग पथके तपासणीसाठी तैनात असतील. तसेच यापुढे अधिकारी आणि कर्मचाऱयांवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्यास त्यांच्याकडे रिव्हॉलवर आणि बंदुका आहेत, त्याचा ते वापर करतील. तसेच यासाठी 19 नवीन गाडय़ा विविध पथकांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे यापुढे गोवा बनावटीच्या चोरटय़ा वाहतुकीला आळा बसेल, असा विश्वास महाराष्ट्र राज्याचे आयुक्त क्रांतिलाल उमाप यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केला. अवैध धंद्यात साहस म्हणून उतरत असलेल्या युवकांना थांबविण्यासाठी यापुढे राज्य उत्पादन शुल्क खाते काम करणार असल्याचे ते म्हणाले.
आयुक्त उमाप यांनी रविवारी सकाळीच राज्य उत्पादन शुल्कच्या इन्सुली तपासणी नाक्याला भेट दिली. या भेटीविषयी संबंधित विभागाने कमालीची गुप्तता पाळली होती. प्रारंभी विभागीय आयुक्त यशवंत पवार, जिह्याचे अधीक्षक बी. एच. तडवी, सांगलीच्या अधीक्षक संध्याराणी देशमुख, साताऱयाचे अधीक्षक अनिल चासकर यांच्यासह निरीक्षक दुय्यम निरीक्षक उपस्थित होते. यावेळी आयुक्त उमाप यांनी विभागीय आयुक्त व अधीक्षकांसमवेत बैठक घेतली. दैनंदिन कामाबाबत आढावा घेतला. तसेच आगामी काळात काम कसे करावे, याबाबत सूचनाही दिल्या.
यावेळी उमाप म्हणाले, गोवा बनावटीच्या बेकायदा दारुची वाहतूक याच भागातून मोठय़ा प्रमाणात होत असली तरी गेल्या काही काळात याला बऱयापैकी चाप बसला आहे. आम्ही त्याच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. पुण्यामध्ये अशीच एक कारवाई करण्यात आली. त्यात व्यावसायिकांनी ट्रक पळविला. मात्र, आम्ही त्याच्या मुळापर्यंत गेलो आणि त्यात ज्यांना अटक केले ते आजही जेलमध्ये आहेत. त्यात काही नावे पुढे आली, त्यांनाही अटक करून कारवाई करण्यात आली. त्यामुळे येत्या काळात जिह्यात येणाऱया अवैध वाहतूकदारांच्या मोकळ्या वाटा बंद करण्यात येतील. त्यासाठी विशेष पथके नेमण्यात येणार आहेत. चौकुळ, आंबोली, करुळ, फोंडा या छुप्या मार्गावर वायुवेग पथके नेमण्यात येणार आहेत. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाला 19 नव्या गाडय़ा मंजूर झाल्या आहेत. काही गाडय़ा संरक्षक जाळी असलेल्या आहेत. प्रत्येक वाहनात एक अधिकारी व पाच ते सहा कर्मचारी असतील.
मुळापर्यंत शोध घेणार
कर्मचाऱयांवर कारवाईदरम्यान होत असलेल्या हल्ल्याबाबत विचारले असता, ज्या-ज्यावेळी असे प्रकार झाले, त्यावेळी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, यापुढे आमचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडे रिव्हॉल्वर आणि बंदुका आहेत, त्याचा वापर करतील, असेही ते म्हणाले. यापुढे केवळ कारवाई न करता प्रत्येक कारवाईच्या मुळापर्यंत जाणार आहोत. तसे नियोजन करण्यात येणार आहे. यात दारू कोठुन खरेदी केली, कोठे जाणार होती, गाडीमालक कोण, रात्रीच्या वेळी त्यांना पायलटिंग करणारे यांचा तपास केला जाणार आहे.
गोवा राज्यातून येणाऱया दारूबाबत तेथील सरकारशी चर्चा करून अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी त्यांची मदत घेणार आहोत. पुणे, नगर, नंदूरबार येथे जशी कारवाई झाली, तशी कारवाई होईल, असे त्यांनी सांगितले.
खात्यातीलच काही कर्मचारी अवैध व्यावसायिकांना मदत करतात का, असे विचारता असे कर्मचारी असल्यास कारवाई करण्यात येईल. अलिकडेच कार्यालयीन शिस्तीचा भाग म्हणून चार कर्मचाऱयांना निलंबित केले. प्राथमिक तपासात त्यांचा गोवा बनावटीच्या दारुशी कोणता संबध नसल्याचे निष्पन्न झाले, असही उमाप यांनी स्पष्ट केले.
प्रमुख चार नाक्यांपैकी इन्सुली एक
इन्सुली तपासणी नाका हा राज्यातील प्रमुख चार नाक्यापैकी एक आहे. आच्छाड-पालघर, नंदूरबारमधील खेडदिगर, धुळेमधील हाडाखेड व इन्सुली हे राज्यातील प्रमुख तपासणी नाके आहे. आमच्याकडे एकूण कर्मचारी संख्या 3611 आहे. त्यातील 2700 कार्यरत आहेत. काही ठिकाणी कर्मचारी संख्या कमी आहे. तरीदेखील चांगले काम केले जाते. डिसेंबरमध्ये 11 कोटीचा मुद्देमाल पकडण्यात आला. राज्यात एकूण 86 कोटी लिटर दारुची विक्री होते. त्यात बिअर 23 लाख लिटर, विदेशी दारू 30 कोटी लिटर, देशी दारू 35 कोटी लिटर असे प्रमाण आहे.
ही तर संयुक्त जबाबदारी!
अवैध दारू विक्री रोखणे ही संयुक्त जबाबदारी आहे. यासाठी ग्रामपंचात सदस्य, सरपंच, पोलीस, पोलीस पाटील यांचीदेखील जबाबदारी आहे. अवैध स्पिरीट वाहतूक रोखण्यासाठी आम्ही विशेष कार्यप्रणाली राबविणार आहोत. त्यासाठी वर्कआऊट सुरू आहे. बाहेरून येणारे स्पिरीट ज्या नाक्यावर येते, तेथे एक कार्यप्रणाली, चेकनाक्यावर एक कार्यप्रणाली आणि व्हॅलीड प्लान्टवर त्याची तपासणी करण्यात येणार आहे, असेही उमाप म्हणाले.









