ऑनलाईन टीम / रायपूर :
छत्तीसगडमधून दिलासादायक बाब समोर आली आहे. राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होताना दिसत आहे. त्यामुळे ज्या जिल्ह्यात संसर्गाचा दर 8 टक्क्यांपेक्षा कमी आहे, तेथील लॉकडाऊनमध्ये सूट देण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना राज्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, ज्या जिल्ह्यात 8 टक्क्यांपेक्षा कमी संसर्ग दर आहे, अशा जिल्ह्यांमध्ये सायंकाळी 6 वाजेपर्यंत बाजार सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित जिल्ह्यातील बाजार आणि दुकाने, मॉल, शोरुम आदी सुरू केली जाणार आहेत. मात्र, यासाठी सायंकाळी 6 पर्यंतची वेळ देण्यात आली असून त्यानंतर सर्व दुकाने बंद करणे सक्तीचे असणार आहे.
यासोबतच हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये केवळ पार्सल सुविधा सुरू असणार आहे. यासाठी स्विगी, झोमॅटो आदी पर्याय उपलब्ध असतील. तसेच यावेळी सिनेमा हॉल बंदच असणार आहेत. तसेच पाहिल्याप्रमाणे नाईट कर्फ्यू जारी असणार आहे.
दरम्यान, अन्य राज्यात म्हणजेच ज्या ठिकाणी 8 टक्क्यांपेक्षा अधिक संसर्ग दर आहे तेथे 31 मे पर्यंत लॉकडाऊन असणार आहे. आतापर्यंत राज्यात 9,53,209 रूग्णांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 8,79,625 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर 12,646 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सद्य स्थितीत राज्यात 60, 938 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.