रविराज च्यारी/ डिचोली
देशात व राज्यात पूर्णपणे लॉकडाऊन असल्याने राज्यातील सण उत्सवांवर संक्रांत आली. लॉकडाऊनमुळे ठिकठिकाणी होणारे रामनवमी उत्सव रद्द झाले. मात्र दरवषी गिमोणे व इतर ठिकाणी एकत्रित येऊन रामनवमी साजरी करणाऱया राज्यातील च्यारी समाज बांधवांनी आपापल्या घरामध्ये रामजन्मोत्सव साजरा करीत या उत्सवाचा आनंद आपल्या कुटुंबियांसमवेत साजरा केला.
गिमोणे पिळगाव येथील श्री रामचंद्र ऊर्फ रघुनाथ देवस्थानात रामनवमीदिनी 2 व 3 मार्च असे दोन दिवस कोणालाही दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार नाही. असे देवस्थान समितीने जाहीर केले होते.
गिमोणे येथील रघुनाथ देवस्थानात राज्यातील विविध भागात विखुरलेल्या च्यारी समाजातील बांधवांतर्फे एकत्रित येऊन रामनवमीचा उत्सव हा दोन दिवस साजरा केला जातो. दुसऱया दिवशी पहाटे वैशिष्टय़पूर्ण राम भरत भेट सोहळा असतो. यावेळी लालखी नाचवून गुलाल उधळला जातो. त्यानंतर मंदिरात व मंदिर सभामंडपात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होतात. या संपूर्ण दोन दिवशीय कार्यक्रमांमध्ये च्यारी समाजातील बंधु भगिनींची मोठी उपस्थित आणि मोठा उत्साह असतो.
घरातच सोहळा साजरा करण्याचे आवाहन
यावषी गिमोणे पिळगाव मंदिरात रामनवमी साजरी होणार नसल्याने अनेकांचा हिरमोड झाला होता. तर देवस्थानतर्फे समाजातील लोकांना गिमोणे येथील रामचंद्र उर्फ रघुनाथ संस्थानात रामनवमघ साजरी होणार नसल्याने रामनवमी दिवशी दु. 12 वा. रामजन्मसमयी आपापल्या घरात श्री रामचंद्राची पुजा करून रामजन्मोत्सव साजरा करावा. शक्मय असल्यास रामाची मूर्ती पाळण्यात घालावी अथवा घरात रामजन्मोत्सव साजरा करताना पाळणा गीत, अंगाई, रामजन्मोत्सव गीत गात उत्साहाने रामजन्मोत्सव साजरा करावा असे आवाहन करण्यात आले होते.
घरातच गायिली गेली अंगाई आणि राम जन्म गीत. राम नाम जप.
त्यानुसार या सोहळय़ात दरवषी सहभागी होणाऱया अनेकांनी आपल्या घरात सकाळी देवाच्या नित्यपूजेबरोबरच श्री रामचंद्रांची पूजा केली. सकाळपासून सुचिर्भुत होऊन आपापल्या घरातील या विशेष उत्सवात सहभागी झाले. दुपारी 12 वा. च्या सुमारास कुलभुषणा दशरथ नंदना.. बाळा जो जो रे.. हे अंगाई गीत गात प्रभु रामचंद्रांचे स्वागत करण्यात आले. तसेच राम जन्मला ग सखे राम जमला… हे राम जन्म गीतही अनेकांनी गायिले तर अनेकांनी ही गीते इंटरनेटच्या माध्यमातून आपापल्या मोबाईलवर वाजवत देवासमोर टाळय़ा पिटल्या. त्याचप्रमाणे श्री राम जय राम जय जय राम.. असे नामस्मरणही करण्यात आले. या अनोख्या रामनवमी साजरीकरणामुळे घराघरातील वातावरण मात्र राममय व चैतन्यदायी बनले होते.
चक्क राम पंचायतन दर्शन सोहळा
गिमोणे-पिळगाव येथील रामचंद्र मंदिरात दरवषी रामनवमी साजरी करताना संध्याकाळी समाजातील लहान मुलांना राम, लक्ष्मण, सीता, हनुमान व इतर देवतांचे वेश परिधान करून व्यासपीठावर राम पंचायतन दर्शन सोहळा म्हणून लोकांना य देवतांचे दर्शन घडविले जाते. मात्र बाराजण-डिचोली येथील चंदेश च्यारी यांच्या निवासस्थानी लहान मुलांनी हा राम पंचायतन दर्शन सोहळा आपल्या क्षमतेनुसार वेशभूषा करीत सादर केला. हा सोहळा त्यांच्या कुटुंबिय वगळता इतरांना अनुभवता आला नसावा. पण त्याचे छायाचित्र फेसबुकवर अपलोड होताच लोकांनी त्यांना भरभरून प्रतिसाद देताना यावषीचा चुकलेला राम पंचायतन दर्शन सोहळा फेसबुकच्या माध्यमातून अनुभवला.









