ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
लेहचा भाग चीनच्या नकाशात दाखविणाऱ्या सोशल मीडिया साईट ट्विटरला केंद्र सरकारने कडक इशारा दिला आहे. केंद्र सरकारने सांगितले की, देशाची अखंडता आणि संप्रभुतेचा अपमान करणारी कोणतीही कृती करू नका. ते कधीच सहन केले जाणार नाही.
तंत्रज्ञान खात्याचे सचिव अजय साहनी यांनी ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डॉर्सी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ट्विटरच्या कृतीमुळे देशाचा अपमान झाला आहे. अशा प्रकारामुळे केवळ ट्विटरवरील लोकांचा विश्वास उडतो असे नाही तर, तुमच्या बाजुच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते.
जम्मू काश्मीर भारताचा अविभाज्य घटक आहे आणि याबाबत कोणताही संशय नाही. याठिकाणी भारताची घटना लागू आहे. अशा वेळी ट्विटरने भारतीय लोकांच्या भावना लक्षात घेतल्या पाहिजेत, असेही साहनी यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
तर ट्वीटरकडून सांगण्यात आले की, आम्ही संवेदनांचा सन्मान करतो आणि आम्ही सरकार बरोबर काम करण्यास कटिबध्द आहोत.