70 लाख कर्मचाऱयांचा सहभाग : 2010 मध्ये झाली होती 6 वी जनगणना
बीजिंग/ वृत्तसंस्था
लोकसंख्येच्या दृष्टीकोनातून जगातील सर्वात मोठा देश असलेल्या चीनमध्ये सातव्या जनगणनेचे कार्य सुरू आहे. यात 70 लाख कर्मचारी घरोघरी जाऊन माहिती जमविणार आहेत. चीनमध्ये सहावी जनगणना 2010 मध्ये झाली होती. त्यावेळच्या जनगणनेनुसार चीनची लोकसंख्या 133 कोटी इतकी होती.
2000 च्या जनगणनेच्या अपेक्षेत 2010 मध्ये चीनची लोकसंख्या सुमारे 7 कोटी 40 लाखाने वाढली होती. जनगणनेत घरोघरी जाऊन नावे, ओळखपत्र क्रमांक, स्री का पुरुष, वैवाहिक स्थिती, शिक्षण आणि व्यवसायाविषयी माहिती घेतली जाणार आहे. अचूक जनगणनेमुळे विकासकामांना वैज्ञानिक पद्धतीने करण्यास मदत होणार असल्याचे नॅशनल डेव्हलपमेंट अँड रिफॉर्म कमिशनचे प्रमुख निंग जिझे यांनी सांगितले आहे.
चीनची लोकसंख्या 2029 पर्यंत 1.44 अब्ज होण्याची शक्यता असून त्यानंतर त्यात न थांबणाऱया घसरणीचे सत्र सुरू होणार असल्याचे शासकीय अहवालात नमूद करण्यात आले आहे. तरुणाईच्या संख्येत घट आणि वृद्धांच्या संख्येत वृद्धीमुळे अत्यंत प्रतिकूल सामाजिक आणि आर्थिक परिणाम होणार असल्याचे अहवालात म्हटले गेले होते.
जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशाने या पार्श्वभूमीवर 2015 मध्ये अशा समस्यांना सामोरे जाण्यासाठी स्वतःचे एक अपत्य धोरण संपुष्टात आणले होते. संयुक्त राष्ट्रसंघाच्या नव्या अनुमानानुसार चीनची लोकसंख्या 1.41 अब्ज आहे. शतकाच्या मध्यापर्यंत चीनची लोकसंख्या कमी होऊन 1.36 अब्ज होण्याचा अनुमान आहे. यामुळे थेटपणे श्रमशक्तीत 20 कोटीची घट होऊ शकते. या अहवालानुसार एक अपत्य धोरण शिथिल करण्यात आल्याने दीर्घ कालावधीत मदत मिळेल, परंतु अल्प कालावधीत यामुळे अवलंबित्वांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.









