बिजींग
अमेरिकेने चीनमधील चेंगडू येथील दूतावास बंद करावा असा आदेश चीनने दिला आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेने चीनचा हय़ूस्टन येथील दूतावास बंद करावयास लावला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून हे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध आणखी बिघडले आहेत. कोरोना विषाणूचा प्रसार आणि आपल्या शेजारी देशांसंबंधीची चीनची आक्रमक भूमिका यामुळे अमेरिकेने चीनला वेसण घालण्यास प्रारंभ केला आहे. चीनच्या विस्तारवादी भूमिकेमुळे अमेरिकेच्या दक्षिण चीन समुद्र आणि दक्षिण आशियातील हितसंबंधांना बाधा येत आहे. तसेच चीनच्या आक्रमकपणामुळे दक्षिण आशिया आणि प्रशांतीय महासागर क्षेत्रात अशांतता निर्माण झाली आहे. परिणामी, अमेरिकेने आता चीनविरोधात कठोर भूमिका घेण्यास आरंभ केला आहे. दोन्हीं देशांमधील संबंध आता न्यूनतम पातळीवर पोहचले असल्याचा इशारा तज्ञांनी दिला आहे. दोन्ही देशांच्या परस्पर व्यापारावरही याचा परिणाम होत आहे. दोन्ही देशांनी एकमेकांकडून आयात होणाऱया मालावर मोठय़ा प्रमाणात कर वाढ केली आहे. मात्र याचा जास्त फटका चीनला बसेल असेही बोलले जाते.
आरोप-प्रत्यारोप
संबंधांमध्ये बिघाड होण्यासाठी अमेरिकाच जबाबदार आहे, असा आरोप चीनने केला. कोणीही कळ काढल्यास चीन स्वस्थ बसणार नाही. अमेरिकेने चीनला जबाबदार धरण्याची वृत्ती सोडावी असा कांगावाही चीनने केला. जगभर कोरोनाच्या उद्रेकामुळे जगाची अर्थव्यवस्था दोलायमान झाली असून चीनलाही याचा फटका बसला आहे. चीनचा स्थूल राष्ट्रीय उत्पन्न विकासदर गेल्या 30 वर्षांमध्ये प्रथमच चार टक्क्यांच्या खाली पोहचला आहे. शिवाय चीनमधून अनेक जागतिक कंपन्या बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे चीन संतप्त असून तो भविष्यकाळात कोणते धोरण अवलंबणार यावर जगाची अर्थव्यवस्था आणि राजकारण यांची दिशा अवलंबून राहील असे मतप्रदर्शन अनेक तज्ञांनी केले आहे.









