ऑनलाईन टीम / बीजिंग :
चीनचं बोईंग 737 हे प्रवाशी विमान दुपारी दोनच्या सुमारास गुआंग्शी प्रदेशात कोसळलं. त्यानंतर विमान जळून खाक झालं. या विमानातून 133 प्रवाशी प्रवास करत होते. त्या प्रवाशांचं नेमकं काय झालं याची माहिती अद्याप समोर आली नाही. घटनास्थळी रेस्क्यू टीम दाखल झाल्या असून, बचावकार्याला वेग आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 737 या बोईंगने दक्षिण-पश्चिम युनान प्रांतातील कुनमिंग चांगशुई विमानतळावरून दुपारी 1.15 वाजता उड्डाण केले. दक्षिण चीनच्या ग्वांगडोंग प्रांतातील ग्वांगझू विमानतळावर दुपारी 3.07 वाजता ते उतरणार होते. अपघातग्रस्त बोईंग हे 162 सीटर विमान आहे. त्यामधून 133 प्रवाशी प्रवास करत होते. दरम्यान, गुआंग्शी प्रदेशात हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले. त्यानंतर विमानाने लगेच पेट घेतला. गुआंग्शी प्रदेश हा डोंगराळ भाग असल्याने डोंगरावरही आग लागली. दरम्यान, विमानात प्रवास करत असेलल्या प्रवाशांबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. घटनास्थळी बचाव आणि मदतकार्य युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे.