नगरसेवक शशिकांत मोदी यांच्या नेतृत्वाखाली घेतली भेट
प्रतिनिधी/ चिपळूण
शहरातील राधाकृष्णनगरमधील रखडलेल्या रस्ता, गटाराची कामे मार्गी लावा अशी मागणी करण्यासाठी शुक्रवारी नागरिक नगर परिषदेवर धडकले. नगरसेवक शशिकांत मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांची भेट घेतली. यावेळी खेराडे यांनी आगामी सभेत ठरावाबाबत पुन्हा चर्चा करून त्यानंतर सर्वच काम मार्गी लावली जाणार असल्याचे आश्वासन दिले आहे
महाविकास आघाडीने शहरातील 37 विकासकामांना मुदतवाढ देण्याचा ठराव केला आहे. त्याला बरेच दिवस झाले तरी नगराध्यक्षा खेराडे यांनी त्यावर सही केलेली नाही. त्यामुळे आघाडी चिडली असून त्यांनी नागरिकांना नगर परिषदेत बोलावून याची माहिती देण्याची मोहीम सुरू केली आहे. यातूनच राधाकृष्णनगरमधील नागरिक खेराडे यांना भेटले.
यावेळी परिसरातील रस्ता, गटार आदी रखडलेल्या कामांबाबत नगसेवक मोदी व नागरिकांनी खेराडे यांना प्रश्न विचारले. यावर खेराडे यांनी 37 कामांना मुदतवाढ देण्याचा झालेला ठराव गोंधळयुक्त असल्यामुळे अशा ठरावावर सहय़ा करून मी अडचणीत येऊ का, असा सवाल उपस्थित केला. तसेच याबाबत आपण मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांना पत्र लिहिले असून त्यांचे उत्तर व आगामी सभेत इतिवृत्त कायम करताना ठरावात सुधारणा झाल्यानंतर शहरातील सर्वच कामे मार्गी लागणार असल्याचे सांगितले. यावेळी नगरसेवक आशिष खातू, नगरसेविका वर्षा जागुष्टे यांच्यासह विनय चितळे, विलास खोत, सुनील चव्हाण, संजय घोलेकर, गजानन पडावे, रमेश आवले, बाबू चव्हाण, वामन उतेकर आदी उपस्थित होते. यानंतर मिठागरी मोहल्ल्यामधील नागरिकांनीही नगरसेवक करामत मिठागरी यांच्या नेतृत्वाखाली खेराडे यांची भेट घेऊन प्रभागातील रस्त्याची कामे लवकर सुरू करण्याची मागणी केली.









