मिरवणे, शिरवली फाटा येथील दोन घटना, तिघांचे पलायन, 3 लाखाचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी / चिपळूण
जंगली प्राण्याची शिकार करण्याच्या इराद्याने विनापरवाना बंदूक घेऊन जाणाऱ्या 7 शिकाऱ्यांना गस्तीवरील पोलिसांनी अटक केल्याची घटना तालुक्यातील मिरवणे व शिरवली फाटा या दोनठिकाणी रविवारी रात्री घडली. मात्र यापैकी तिघेजण पळून गेले. त्यांच्याकडून 2 लाख 80 हजार 970 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शिरवली फाटा येथे रविवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास पोलीस गस्त घालत असताना आदित्य अनंत चव्हाण (25), अमर सदाशिव चव्हाण (27), संकेत अनंत चव्हाण (23., तिघे-ओमळी-चव्हाणवाडी), चेतन सदानंद रसाळ, (35, ढोकवली), सोहम कैलास कदम (27), सागर अशोक वाघमारे (23, दोघे-वाणीआळी-चिपळूण) हे सर्वजण विनापरवाना बंदुकीसह टाटा सुमो गाडीने शिकारीसाठी जात होते. त्यावेळी ते पोलिसांना सापडले. या 6जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 18 हजाराची बारा बोअरची सिंगल बॅरल बंदूक, 360 रुपयाचे जिवंत काडतूस, 50 रुपयांची पाऊच, 100 रुपयांची बॅटरी, 1 लाख 50 हजार रुपयांची टाटा सुमो असा एकूण 1 लाख 68 हजार 510 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या सर्वांना न्यायालयात हजर केले असता बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मन्सूर मणेर करीत आहेत.
तसेच दुसऱ्या घटनेत मिरवणे – शिरवली बायपास कच्चा रोड परिसरात रविवारी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास पोलीस गस्त घालत होते. त्यावेळी नीलेश अशोक लाड (24, शिरवली-सहाणवाडी), राजेश सत्यवान लाड, तेजस सत्यवान लाड, यश (पूर्ण नाव माहिती नाही) हे चारजण बोलेरो मॅक्स पिकअप गाडी घेऊन विनापरवाना बंदुकीसह जंगली पाण्याची शिकार करण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्यांना पाहिले. पोलीस येत असल्याचे समजताच राजेश, तेजस व यश यांनी त्या ठिकाणाहून पलायन केले. मात्र पोलिसांना नीलेश सापडला. त्याच्याकडे 22 हजाराची एक बारा बोअरची डबल बॅरल बंदूक, 360 रुपयांचे जिवंत काडतूस, 100 रुपयांची बॅटरी आणि 90 हजार रूपये किंमतीची बोलेरो मॅक्स पिकअप गाडी असा एकूण 1 लाख 12 हजार 460 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नीलेश यास न्यायालयात हजर केले असता बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, पलायन केलेल्या राजेश, तेजस व यश यांचा पोलीस शोध घेत आहेत.
या दोन्ही कारवाया पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मन्सूर मणेर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नामदेव जाधव, पोलीस कर्मचारी पप्पू केतकर, आशिष भालेकर, लालजी यादव, दिलीप जानकर आदींच्या पथकाने केली.