कोरोना संकटातील मदतीची साखर काही संचालकांनी लाटल्याचा उपाध्यक्ष यमकर यांचा आरोप अध्यक्ष मेघराज राजेभोसलेंवर मनमानी कारभाराचा ठपका
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोनाच्या संकट काळात अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्यावतीने गरजू सभासदांना साखर वाटण्यात आली. त्यातील शिल्लक साखर काही संचालकांनी लाटली असल्याचा गंभीर आरोप उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी मला दोन लाख रूपयांच्या चेक गहाळ प्रकरणात खोटा आरोप करून नाहक गोवण्याचा प्रयत्न केल्याचेही यमकर यांनी सांगितले. यावेळी माजी अध्यक्ष अभिनेते विजय पाटकर कार्यवाह बाळा जाधव, संचालक सतिश रणदीवे, सतिश बिडकर, मिलिंद अष्टेकर उपस्थित होते. यमकर यांच्या खळबळजनक आणि गंभीर आरोपांनंतर आता चित्रपट महामंडळातील वाद, संघर्ष उफाळून आला आहे.
महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्याकडून मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप करत उपाध्यक्ष यमकर म्हणाले, कोरोना संकट काळात महामंडळाकडून गरजू सभासदांना मदत म्हणून वाटण्यात येणारे गृहपयोगी साहित्य, साखर, तेल अशा वस्तू काही संचालकांनी लाटल्या. हा गंभीर प्रकार आहे. पण अध्यक्ष राजेभोसले यांनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. मदत म्हणून देण्यात येणाऱया पैशातील पंचवीस हजार रूपये जेवनावळीवर खर्च करण्यात आले. या प्रकारात सहखजिनदार शरद चव्हाण, स्वीकृत संचालक रवि गावडे, प्रशासकीय अधिकारी अर्जुन नलवडे आणि सभासद सुरेंद्र पन्हाळकर सहभाग असल्याचेही यमकर यांनी सांगितले. साखर लाटण्याच्या प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेज यमकर यांनी या पत्रकार परिषदेत दाखविले.
यमकर म्हणाले, अध्यक्ष राजेभोसले यांच्या निर्णयाविषयी जर कुणी विचारणा केली तर ते त्याच्या विरोधात राजकारण करून त्रास देण्याचा प्रकार करतात. त्याचा अनुभव मलाही आला आहे. दोन लाख रूपयांच्या चेक गहाळ प्रकरणाच्या खोटÎा आरोप मला गुंतवून माझ्याच नावावर रक्कम भरण्याचा प्रकारही त्यांनी केला आहे, असा आरोपही यमकर यांनी केला.
यमकर म्हणाले, 54 वर्षाची परंपरा असलेल्या चित्रपट महामंडळाचे अस्तीत्वच घालवून ही संस्था महाकला मंडळ सारख्या संस्थेत सामील करण्याचा घाट घातला जात आहे. या मागे अध्यक्ष राजेभोसले यांचा स्वार्थ आहे. या प्रकाराला सर्व कलाकारांनीही विरोध केला आहे. माजी अध्यक्ष अभिनेते विजय पाटकर म्हणाले, महामंडळामध्ये घटनाबाह्य गेष्टी घडत असून या प्रकरणाबाबत कारवाई होणे गरजेचे आहे. बाळा जाधव म्हणाले, काही लोकांनी कलाकारांसाठी रोख स्वरुपात मदत केली होती. त्याचा हिशेबच महामंडळाकडे नाही.
कार्यकारिणीची एकही बैठक नाही
महामंडळाच्या कार्यकारिणीची बैठक घ्या, निर्णयाची माहिती द्या, अशी मागणी आम्ही वारंवार करूनही अध्यक्षांनी कधीही बैठक घेतली नाही, माहिती दिली नसल्याचेही यमकर यांनी सांगितले.
निवडणूक जवळ आल्याने खोटे आरोप : अध्यक्ष मेघराज राजे भोसले
दरम्यान, यमकर यांच्या आरोपांबद्दल अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांची प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, महामहामंडळाची निवडणूक जवळ आल्याने विजय पाटकर हे धनाजी यमकर यांच्या माध्यमातून खोटे आरोप करत आहेत. महामंडळाला आणि मला बदनाम करत आहेत. साखर लाटण्याचा प्रकार घडलेला नाही. साखर बदलून आणण्यात आली होती. चेक गहाळ प्रकरणी तर अर्जुन नलवडे हे यमकर यांच्यावर फौजदारी करणार आहेत. आम्ही महामंडळ आणि सभासदांच्या हिताचा कारभार केला आहे. महाकला मंडळाच्या माध्यमातून राज्यातील सर्व कलाकारांना एकत्रित आणण्याचा, त्यांच्या विकासाचे प्रयत्न करण्याचा प्रामाणिक हेतू असताना त्यावर शंका उपस्थित केली जात आहे. आम्ही कोणताही घटनाबाहÎ निर्णय घेतलेला नाही. लवकरच पत्रकार परिषद घेऊन खोटे आरोप करणाऱयांचा भांडफोड करणार असल्याचेही राजेभोसले यांनी सांगितले.









