मुंबई : ज्येष्ट चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि लेखक सावन कुमार टाक यांचे वयाच्या 86 व्या वषी गुरुवारी निधन झाले. हृदयविकाराचा झटका आणि अनेक अवयव निकामी झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू होते. सावन कुमार यांनी सौतन, सौतन की बेटी, सनम बेवफा, बेवफा से वफा यांसारखे अनेक चित्रपट दिग्दर्शित केले. ‘जिंदगी प्यार का गीत है….’ गाण्याचे बोल सावन कुमार यांनी लिहिले आहेत. त्यांनी 1967 मध्ये आलेल्या नौनिहाल या चित्रपटातून निर्माता म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
सावन कुमार यांची प्रकृती गेल्या अनेक दिवसांपासून चिंताजनक होती. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना मुंबईतील कोकिळाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी सकाळी प्रकृती बिघडल्याने त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले असता दुपारी सव्वाचारच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत जाहीर केले. त्यांना मूत्रपिंडाशी संबंधित आजार होता. कुटुंबियांनी त्यांना न्यूमोनिया असल्याच्या संशयाने रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, तपासणीअंती त्यांची मुत्रपिंडे निकामी झाल्याचे स्पष्ट झाले होते.