पतीस अटक, आईविना दोन मुले पोरकी
प्रतिनिधी/ खेड
तालुक्यातील भेलसई-कुपवाडी येथे पत्नीचा निर्घृण खून केल्याप्रकरणी पती सुरेश सुभाष चव्हाण (43) यास शुक्रवारी पहाटे 4 च्या सुमारास येथील पोलिसांनी अटक केली. दारूच्या नशेत व पत्नीवरील चारित्र्याच्या संशयातून त्याने खून केल्याचे तपासातून उघड झाले आहे. या घटनेने दोन मुले आईविना पोरकी झाली आहेत.
सुजिता सुरेश चव्हाण या 40 वर्षीय विवाहितेचा मृतदेह भेलसई-कुपवाडी नदीकिनारी काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आला. या बाबत पोलीस पाटलांनी येथील पोलीस स्थानकात खबर दिल्यानंतर पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. महिलेच्या मृतदेहाची पाहणी केल्यानंतर तिच्या डोक्यात धारदार शस्त्र किंवा दगडाने ठेचून खून केल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे गतीमान केली. घटनेच्या पूर्वी पती सुरेश व त्याची पत्नी सुजिता हे दोघे एकाच मार्गावरून गेल्याचे काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आले होते. ही बाब पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी प्राथमिक चौकशीसाठी पती सुरेश यास ताब्यात घेतले. पोलिसी हिसका दाखवल्यानंतर पत्नीचा खून केल्याची कबुली त्याने दिली. सुरेश हा रत्नागिरीतील करबुडे येथे आंब्याच्या बागेत काम करत होता. त्याचा यापूर्वी अपघातही झाला होता. अपघातामुळे त्याच्या डोक्यावर परिणाम होऊन तो बऱयाचदा विचित्रपणे वागत होता.
त्याला दारूचेही व्यसन होते. पत्नीच्या चारित्र्यावरही तो सातत्याने संशय घेत होता. यातून दोघांमध्ये सतत वादही होत होते. शिवाय तो पत्नीला नेहमी मारहाणही करत होता. अखेर दारूच्या नशेतच चारित्र्याच्या संशयातून त्याने पत्नीचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून तशी कबुलीही दिली आहे. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. मुलगा दहावीत, तर मुलगी इ. 6वीत शिकत आहे. वडिलांनीच आईचा खून केल्याने दोन्ही मुलांची मायेची सावलीच हरवली असून या घटनेने सर्वच स्तरांतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या बाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की करत आहेत.









