फरार 5 जण महाबळेश्वर पोलिसांकडून जेरबंद
प्रतिनिधी/ खेड
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटालगत धामणदेवीनजीक मुंबईहून गुहागरच्या दिशेने जाणाऱया खासगी आरामबसमधील चाकरमान्यांना लुटून फरार झालेल्या 5 जणांच्या टोळीला महाबळेश्वर पोलिसांनी जेरबंद केले. या टोळीने दुचाकींसह ओमनी व्हॅन चोरत महाबळेश्वर गाठल्याची माहिती तपासात उघड झाली असून वाहन चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
हरी शहाजी शिंदे, अनिल लालासाहेब शिंदे, उत्तम सुंदर शिंदे, दत्तात्रय लालासाहेब शिंदे, संतोष पवार (सर्व उंबरा-खामकरवाडी, उस्मानाबाद) अशी अटकेतील साथीदारांची नावे आहेत. पोलादपूर पोलिसांनी यापूर्वीच अशोक धर्मराज जाधव याला गजाआड केले आहे.
13 ऑगस्ट रोजी सुनील शंकर दामले हे पिंपळेश्वर ट्रव्हल्सच्या खासगी आरामबसमधून चाकरमान्यांना घेऊन मुंबईहून गुहागरच्या दिशेने जात होते. धामणदिवी हद्दीनजीक बस आली असता अज्ञात चोरटे बसमधील साहित्य चोरत असल्याची बाब एका प्रवाशाच्या लक्षात आले. त्याने चालकाल याची माहिती देत बस थांबवण्यास सांगितले. बस थांबताच चोरटय़ांनी पलायन केले. यादरम्यान बसमधील 8 प्रवाशांचा 24 हजार 500 रूपये किंमतीचा ऐवज चोरीला गेल्याचे दिसून आले. याबाबत पोलादपूर पोलीस स्थानकात खबर दिल्यानंतर पोलादपूर पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी केली. धामणदिवी ग्रामस्थांच्या मदतीने कशेडी घाटाच्या दरीतील जंगलमय भागात लपलेल्या चोरटय़ाच्या मुसक्या आवळल्या.
या चोरटय़ास पोलिसी हिसका दाखवल्यानंतर अन्य 5 जणांची नावे उघड केली होती. त्यानुसार पोलादपूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. याचदरम्यान, एक दुचाकी व मारूती व्हॅन चोरीस गेल्याची तक्रार पोलादपूर पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली होती. फरार चोरटे मारूती व्हॅनद्वारे महाबळेश्वर येथे पोहोचले असता पोलिसांकडून झडती होण्याच्या शक्यतेने व्हॅन तेथेच सोडून पलायन केले होते. महाबळेश्वर पोलिसांचा संशय बळावल्यानंतर त्यांनी जंगलमय भाग पिंजून काढत पाचहीजणांच्या मुसक्या आवळल्या.
या टोळीच्या अटकेने कोकणातील अनेक वाहन चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने महाबळेश्वर व पोलादपूर पोलिसांकडून तपास सुरू आहे.









