गणेशोत्सव कालावधीत स्थानिक नागरिकांमध्ये कोरोनाचे संक्रमण वाढल्याने कोरोनाचा धोका कायम आहे. वाढत चाललेली कोरोनाची साखळी तोडण्याचे आव्हान कोकणवासियांसमोर उभे राहिले आहे.
गणेशोत्सव काळात पुणे, मुंबई हॉटस्पॉटमधून येणाऱया नागरिकांमुळे कोरोनाचा फैलाव कोकणात वाढणार हा संभाव्य धोका होता आणि तो खराही ठरला. आता गणेशोत्सवाला आलेले चाकरमानी अनंत चतुर्दशीनंतर 2 सप्टेंबरपासून परतीच्या
प्रवासाला लागतील. त्यानंतर कोरोनाचा फैलाव कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, गणेशोत्सव कालावधीत स्थानिक नागरिकांमध्ये कोरोनाचे संक्रमण वाढल्याने कोरोनाचा धोका कायम आहे. वाढत चाललेली कोरोनाची साखळी तोडण्याचे आव्हान कोकणवासियांसमोर उभे राहिले आहे.
कोकणात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून मागील पाच महिने मागे वळून पाहिले तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दोन्ही जिल्हय़ात पहिल्या चार महिन्यात कोरोनाचे रुग्ण थोडय़ा-अधिक प्रमाणात आढळत होते. मात्र, ऑगस्ट महिन्यात गणेशोत्सवासाठी जिल्हय़ाबाहेरून येणाऱयांची संख्या वाढल्यानंतर कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही झपाटय़ाने वाढत गेली आणि आता चाकरमानी कोकणातून परतीच्या प्रवासाला लागले, तरी कोकणात कोरोनावर लवकर नियंत्रण मिळवणे अवघड बनले आहे.
नोकरीनिमित्त कोकणातील लोक मोठय़ा प्रमाणात मुंबईला असतात आणि दरवषी उन्हाळी सुट्टीत व गणेशोत्सवात आपल्या गावी येतात. या वर्षीही कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन असतानासुद्धा पुणे, मुंबईत घरी बसून कंटाळलेल्या चाकरमान्यांनी मे महिन्यात मिळेल त्या मार्गाने गावची वाट धरली. दोन्ही जिल्हय़ात दोन लाखाहून अधिक चाकरमानी आले असून गणेशोत्सवात त्यापेक्षाही दुपटीने चाकरमानी आले. असे असतानाही त्यावेळी लॉकडाऊनच्या आणि कोविडच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली. त्यामुळे दोन लाखाहून जास्त चाकरमानी येऊनही परिस्थिती नियंत्रणात राहिली.
मे महिन्याच्या उन्हाळी सुट्टीनंतर चाकरमानी पुन्हा गणेशोत्सवाला लाखेंच्या संख्येने येतात. त्यामुळे गणेशोत्सवात येणाऱया चाकरमान्यांपासून कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो, हा संभाव्य धोका लक्षात घेऊन रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने कोविड 19च्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे ठरविले. परंतु लॉकडाऊनमध्ये आधीच काही प्रमाणात शिथिलता आणली होती आणि चाकरमान्यांना खुश करण्यासाठी कोविडच्या नियमावलीत शिथिलता आणली गेली. क्वारंटाईन कालावधी 14 दिवसांवरून दहा दिवसांवर आणला. कोविड टेस्ट करून आलेल्यांसाठी तीन दिवस क्वारंटाईन कालावधी केला. त्याचा परिणाम असा झाला की, कोकणात मागील चार महिन्यात जेवढे रुग्ण सापडले नाहीत तेवढे गणेशोत्सव कालावधीत ऑगस्टच्या महिन्यात आढळले आहेत.
जिल्हय़ाबाहेरून आलेल्या नागरिकांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत गेला आणि आज जे कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत, त्यात स्थानिक लोकच जास्त आहेत. त्यामुळे आता चाकरमानी जिल्हय़ातून परतले तरी कोरोनाचा धोका कायम आहे. आणि स्थानिक लोकांमध्ये संसर्ग होऊ लागल्याने कोरोनावर मात करणे अवघड आहे.
केंद्र व राज्य सरकारने अनलॉकची प्रक्रिया सुरू केली आहे. सर्व बाजारपेठा खुल्या झाल्या. हॉटेल, लॉज सुरू झाली. बससेवा सुरू झाली आणि आता तर ई- पाससुद्धा रद्द केला आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या मिशन बिगीन अंतर्गत टप्याटप्याने सर्वच खुले व्हायला लागल्याने आता तर कोरोना संक्रमणाचा धोका वाढला आहे. त्यामुळे गेले चार-पाच महिने कोरोना नियंत्रणात ठेवणाऱया प्रशासनाची खऱया अर्थाने कसोटी लागणार आहे.
कोकणात गणेशोत्सवाला एक लाखाहून जास्त लोक आले. त्या आधीही लोक आलेले आहेत, ते आता अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्याने गणेशोत्सव संपवून 2 सप्टेंबरपासून नोकरीनिमित्त परतीच्या प्रवासाला लागतील. कोकणात येताना त्यांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागले. मात्र, आता सरकारने ई-पास रद्द केल्यामुळे चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुखकर होणार आहे. 4 सप्टेंबरपर्यंत विशेष रेल्वे, एसटी बसेससुद्धा सोडल्या आहेत. त्यामुळे निश्चितच कोकणात आलेले चाकरमानी पुणे, मुंबईत परततील आणि कोकणात गेल्या महिनाभरात वाढलेला कोरोनाचा फैलाव कमी होईल, अशी अपेक्षा आहे. चाकरमानी परतल्यामुळे कोरोनाचा फैलाव कमी होईल. परंतु धोका संपला, असे म्हणता येणार नाही. कारण स्थानिक लोकांमध्ये जोरात संक्रमण सुरू झाले आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाला पुन्हा एकदा आठ-दहा दिवसांसाठी कडक लॉकडाऊन करण्याचे धाडसी पाऊल उचलावे लागेल किंवा कोविडच्या नियमांची कडक अंमलबजावणी करावी लागेल. अनावश्यक गर्दी टाळणे, मास्क न वापरणाऱयांवर कारवाई करणे, जाहीर समारंभ, कार्यक्रमांवर कडक बंदी आणणे यासारखी कठोर पावले उचलावी लागणार आहेत. लोकांनीही आपल्यापासून दुसऱयाला संसर्ग होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. तरच कोकणात पूर्ववत स्थिती निर्माण होईल. अन्यथा पुणे-मुंबईप्रमाणे कोरोनाचा हॉटस्पॉट होऊन कोरोनावर नियंत्रण आणायला वेळ लागेल. त्यामुळे आता कोरोनाचा धोका कमी करण्याचे आव्हान कोकणवासियांसमोर उभे राहिले आहे.
रत्नागिरी जिल्हय़ात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या चार हजारावर गेली आहे. रत्नागिरी जिल्हय़ात दिवसागणिक 50 ते 100 रुग्ण वाढत आहेत. या जिल्हय़ात तर कोरोनाचे थैमान सुरू आहे. तर सिंधुदुर्ग जिल्हय़ात रत्नागिरी जिल्हय़ापेक्षा फारच कमी रुग्ण होते. मात्र, गेल्या महिनाभरात 900 रुग्ण सापडल्याने जिल्हय़ात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 1300 च्या पार झाला आहे. त्यामुळे कोकणातील दोन्ही जिल्हय़ात गणेशोत्सव कालावधीत रुग्णसंख्या तीव्र वेगाने वाढल्याचे दिसत आहे. स्थानिक लोकांमध्ये होणाऱया संक्रमणाबरोबरच सामूहिक संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासानंतर तरी कोरोना वाढीचा धोका कमी होईल, अशी आशा धरूया.
संदीप गावडे








