प्रतिनिधी/ बेळगाव
जेवणात चव वाढविणाऱया मिठाच्या दरात किंचित वाढ झाली आहे. मागील आठवडाभरापासून किलोमागे 2 रुपयांनी मिठाचे दर वाढले आहेत. गुजरात आणि तामिळनाडू येथून मिठाचा पुरवठा होत असतो. मात्र तामिळनाडूत मोठय़ा प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने मिठाची आवक कमी झाली आहे. त्यामुळे दर वाढले आहेत.
मीठ नसल्यास जेवणाला स्वाद येत नाही म्हणून अन्नपदार्थांमध्ये मीठ वापरण्याशिवाय पर्याय नाही. मात्र या मिठाचे दर काही प्रमाणात वाढले आहेत. पूर्वी 10 रुपये किलो दराने विक्री होणारे मीठ आता 15 रुपये किलो झाले आहे. त्यामुळे किलोमागे 5 रुपये जादा मोजावे लागत आहेत.
जशी माणसाला पाण्याची आवश्यकता आहे तशीच जेवणात मिठाची आवश्यकता आहे. विविध पदार्थ तयार करण्यासाठी आणि त्यांना चव आणण्यासाठी मिठाची अत्यंत गरज आहे. मात्र मागील काही वर्षांपासून स्थिर असलेल्या मिठाचा दर वाढला आहे. पूर्वी 25 किलो वजनाची मिठाची बॅग 160 रुपयाला विकली जात होती. आता हिच बॅग 190 ते 210 रुपयांवर पोहोचली आहे.









