पोस्टर्स लावण्यावरुन दोन्ही बाजूंकडून तक्रारी
प्रतिनिधी / मडगाव
बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी आमदार या नात्याने शिक्षणक्षेत्रात काय केलेय? या मुद्दावरून त्यांना ‘डिबेट’ मध्ये सहभागी होण्याचे आव्हान आम आदमी पक्षाने दिले असून तशा आशयाचे बॅनर्स बाणावलीत लावताना चर्चिल आलेमाव यांचे पूत्र सावियो आलेमाव व पुतण्या वॉरेन आलेमाव यांनी आपच्या कार्यकर्त्यांच्या अंगावर हात टाकल्याने बुधवारी रात्री संघर्ष निर्माण झाला. या प्रकरणी आपच्या कार्यकर्त्यांनी कोलवा पोलीस स्थानकावर तक्रार नोंद केल्याची माहिती आपचे नेते कॅप्टन व्हेंझी व्हिएगस यांनी दिली.
चर्चिल आलेमाव हे गेली अनेक वर्षे राजकारणात आहेत. मात्र, त्यांनी बाणावली मतदारसंघात शिक्षणक्षेत्राचा विकास व्हावा यासाठी काय केले ते सांगावे व त्यावर डिबेट घेण्याचे आव्हान आम आदमी पक्षाचे नेते कॅप्टन व्हेंझी व्हिएगस यांनी दिले होते. आम आदमी पक्षाने तसे बॅनर्स करून बाणावली मतदारसंघात लावले होते. बुधवारी रात्रीसुद्धा आपचे कार्यकर्ते असे बॅनर्स लावत असताना सावियो आलेमाव व वॉरेन आलेमाव यांनी त्यांना हरकत घेतली. या कार्यकर्त्याकडे असलेले शिडी फेकून दिली तसेच कार्यकर्त्यांच्या अंगावर हात टाकला. त्या संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
या घटणेनंतर आपच्या कार्यकर्त्यांनी कोलवा पोलीस स्थानकावर जाऊन सावियो आलेमाव व वॉरेन आलेमाव यांच्या विरोधात तक्रार नोंद केली. या प्रकरणी कोलवा पोलीस चौकशी करीत आहेत. काल उशिरा पर्यंत पोलिसांनी कुणाच्याही विरोधात गुन्हा नोंद केला नव्हता.
चर्चिल आलेमाव व कॅप्टन व्हेंझी व्हिएगस यांची छायाचित्रे असलेले बॅनर्स आपने लावल्याने बाणावलीत बुधवारी वातावरण तापले होते. त्यात बॅनर्स लावण्याचे प्रकार सुरू असल्याने सावियो आलेमाव व वॉरेन आलेमाव यांनी आपच्या कार्यकर्त्यांना रोखून धरले. यावेळी धक्काबुकीचा प्रकार घडला. आपचे बाणावली जिल्हा पंचायत सदस्य हेन्झल फर्नांडिस यांनी आपल्या स्कुटरची देखील हानी केल्याचा आरोप केला आहे.
या घटनेची माहिती सुरवातीला आमदार चर्चिल आलेमाव यांना मिळाली नाही. मात्र, सोशल मीडियावर व्हिडियो व्हायरल झाल्यानंतर चर्चिल यांना एकूण परिस्थिती कळली. काल गुरूवारी त्यांनी कोलवा पोलीस स्थानकात भेट देऊन बॅनर्स लावण्यासंदर्भात अधिक माहिती मिळविली.
काल-परवाच्या आपने मला राजकारण शिकवू नये : चर्चिल
आम आदमी पक्षाने आपल्याला शिक्षण क्षेत्राच्या मुद्दावरून आव्हान दिले असले तरी या पक्षाने गोव्यासाठी कोणते योगदान दिलेय ते अगोदर सांगावे. निवडणुका जवळ आल्या म्हणून जनतेची दिशाभूल करण्याच्या भानगडीत पडू नये. आपण आमदार, खासदार व मंत्री तसेच मुख्यमंत्रीपद देखील सांभाळले आहे. आपण गेली कित्येक वर्षे जनतेची सेवा केली असून काल-परवा गोव्याच्या राजकारणात आलेल्या आपने आपल्याला राजकारण शिकवू नये असे चर्चिल आलेमाव यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.









