प्रतिनिधी /मडगाव
निवडणुकीत वापरण्यात येणाऱया इव्हीएम आपला भरोसा नाहीय. या इलेक्ट्रॉनिक वोटींग मशीन (इव्हीएम) मध्ये अत्याधुनिक उपकरणारद्वारे फेरफार केला जाऊ शकतो असा दावा बाणावलीचे माजी आमदार व तृणमूल काँग्रेसचे उमेदवार चर्चिल आलेमाव यांनी काल पत्रकार परिषदेत केला. ज्या उमेदवारांना निवडणुकीत विजयी होण्याची खात्री वाटते, त्यांनाच दणका बसू शकतो, त्यामुळे इव्हीएमद्वारे केली जाणारी मत मोजणी ग्राहय़ धरू नये अशी मागणी त्यांनी केली आहे.
चर्चिल आलेमाव यांचा यापूर्वी नावेली मतदारसंघात पराभव झाला होता. त्यावेळी ‘इव्हीएम’मुळेच आपला पराभव झाल्याचा दावा केला होता. त्यावेळी त्यांनी इव्हीएमद्वारे निवडणूक घेण्याची प्रक्रिया बंद करावी अशी मागणी केली होती. त्यानंतर बाणावली मतदारसंघात ते पुन्हा निवडून आले. त्यावेळी इव्हीएमद्वारेच मतदान प्रक्रिया घेण्यात आली होती व ते विजयी झाले होते. त्यावेळी त्यांनी इव्हीएमच्या विरोधात कोणतेच भाष्य केले नव्हते. मात्र, आत्ता त्यांनी इव्हीएमच्या विरोधात पुन्हा तोंड उघडले आहे.
इव्हीएम मतदान प्रक्रिया ही अयोग्य असून पूर्वी प्रमाणेच निवडणुकीत ‘शिक्के’ मारण्याची प्रक्रिया राबवावी अशी त्यांची मागणी होती. मात्र, या त्यांच्या मागणीला कोणीच प्रतिसाद दिला नव्हता. आत्ता विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. त्यामुळे इव्हीएमद्वारे निकाल न करता व्हीव्हीपीएटी (व्होटड व्हेरिफाईड पेपर ऑडिट ट्रेल) द्वारे करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
व्हीव्हीपीएटी द्वारे मत मोजणी केल्यास ती अचुक होईल. त्यात फेरफार करता येत नाही. कारण, आपण मतदान केल्यानंतर आपण कुणाला मतदान केले, त्याचे चिन्ह या ठिकाणी पहावयास मिळते. त्यामुळे त्यात कुणालाच बदल करता येत नाही असा दावा त्यांनी केला. गोव्यातील सर्व राजकीय पक्षांनी व्हीव्हीपीएटी द्वारे मतमोजणी करावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करावी असे आवाहन त्यांनी पत्रकार परिषदेत केले. आपण स्वता निवडणूक आयोगाकडे त्या संदर्भात पत्रव्यवहार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मच्छीमार बांधवांवर होणार परिणाम
कोस्टल झोन मॅनेजमेंटकडून बंदर मर्यादा हटवण्याची राज्य सरकारची याचिका मंगळवारी फेटाळली. त्यामुळे राज्य सरकारला जबरदस्त फटका बसला आहे. सीझेडएमपी 2011च्या मान्यतेवर विचार करण्यासाठी दिल्लीत बैठक झाली. त्यात बंदर मर्यादा हटविण्याची राज्य सरकारची याचिका फेटाळण्यात आल्याने गोव्यातील मच्छीमार बांधवांवर जबरदस्त परिणाम होणार असल्याची माहिती चर्चिल आलेमाव यांनी पत्रकार परिषदेत दिली. सरकारने या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून मच्छीमार बांधवांच्या समस्या निकालात काढाव्यात अशी मागणी त्यांनी यावेळी केली.









