सुशांतसिंह राजपूतची हत्या की आत्महत्या हा गुंता अद्यापही सुटलेला नसताना सध्या या विषयावरची चर्चा मागे पडत ती भलतीकडेच भरकटू लागली आहे. प्रारंभी सुशांतच्या खुन्याचा शोध घेणारी यंत्रणा हळूहळू चित्रपटसृष्टीतील नशेबाज कंपूचा शोध घेण्याकडे कधी सरकली हे समजलेच नाही. पण यानिमित्ताने मात्र चंदेरी दुनियेची झगमगती बाजू सोडून पडद्यामागील काळी बाजू समोर येत आहे. ड्रग्ज मुद्यावरून चित्रपटसृष्टीत दोन गट पडले असून, सध्या ते एकमेकावर अत्यंत हीन पातळीवरून चिखलफेक करत आहेत. त्यासाठी जी भाषा वापरली जाते ती पाहता त्यांचे सभ्यतेचे बुरखे गळून पडले आहेतच, शिवाय दिवसेंदिवस यातून घाणच बाहेर पडत आहे. सुशांतच्या आत्महत्येचा एक खडा पडला आणि बघता बघता संपूर्ण इंडस्ट्री ढवळून निघाली. दरम्यानच्या काळात या प्रकरणाने अनेक वळणे घेतली. सुशांतचा पोस्टमार्टम रिपोर्ट, इंडस्ट्रीमधील नेपोटिझम, मुंबई आणि बिहार पोलिसांमधील द्वंद्व, सीबीआयची नाटय़पूर्ण एन्ट्री, ईडी आणि रियाचा जबाब, मनी लॉन्ड्रिंग आणि शेवटी चित्रपटसृष्टीतील ड्रग्ज संस्कृतीवर हे प्रकरण येऊन ठेपले. संसदेमध्ये हे प्रकरण गाजले. सुशांतसिंहशी असणारे वैयक्तिक संबंध, बिघडलेले समाजस्वास्थ्य, ड्रग्जकडे आकर्षित होणारी तरुणाई याबाबत चिंता व्यक्त करत प्रख्यात भोजपुरी अभिनेता रवी किशन यांनी हा मुद्दा संसदेत उपस्थित केला. या मुद्याला अनुसरून उत्तर देताना खासदार व एकेकाळच्या आघाडीच्या अभिनेत्री जया बच्चन यांनी रवी किशन यांच्यावर आगपाखड केली. रवी किशन यांच्या या वक्तव्यामुळे बॉलीवूडची बदनामी होत असल्याची टीका जया बच्चन यांनी केली. ’जिस थाली मे खाते हो उस थाली मे छेद करते हो’, असा जया बच्चन यांनी सवाल उपस्थित केला. नंतर थाळीवरून बॉलीवूड व सोशल मीडियावर व्यक्त होणाऱया एकापेक्षा एक प्रतिक्रिया पाहिल्यावर आणि ऐकल्यानंतर त्याची दुर्गंधी सुटली हे मात्र निश्चित. कंगना राणावत, जया बच्चन, उर्मिला मातोंडकर, जयाप्रदासह चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांची चिखलफेक पाहिल्यानंतर नळावरील भांडणेसुद्धा कमी वाटावीत, असे खेदाने म्हणावे लागेल. सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाच्या निमित्ताने ज्यांची जीभ घसरत चालली आहे त्यांना आता आवरायला हवे. सुशांत हा फिल्म इंडस्ट्रीमधल्या नेपोटिझमचा बळी असल्याचा आरोप अभिनेत्री कंगनाने सर्वप्रथम केला. त्याच्या हातून काही चांगले चित्रपट काढून घेतले गेले. यशराज बॅनरखालील ’पानी’ चित्रपटासाठी सुशांतने वर्षभर मेहनत घेतली होती. पण अचानक हा प्रोजेक्ट बंद केला. शिवाय त्याच्याकडून आणखीन चार चित्रपट काढून घेतल्यामुळे तो नैराश्यात गेला. हे सर्व मुद्दे कंगनाने उपस्थित केले. त्याला सोशल मीडियाची जोड मिळाली. वास्तविक अभिनेता, अभिनेत्रीच्या जवळचा नातलग किंवा घराण्यातील आहे म्हणून एखाद्याला वशिलेबाजीने स्थान मिळता कामा नये हे कुणीही मान्य करेल. बॉलीवूडमध्ये अनेक जण अशा नेपोटिझमची शिकार झाले हे वास्तवही नाकारता येणार नाही. पण मधल्या काळात नेपोटिझम आणि बिहार-मुंबई पोलीस वादाचे विषय मागे पडले. त्याची जागा आता ड्रग्ज कनेक्शनने घेतली आहे. त्यातच 99 टक्के बॉलीवूड ड्रग्जमध्ये बुडाले आहे, असा बॉम्ब कंगनाने टाकला. हिंदी चित्रपटसृष्टीतील ड्रग्जसंस्कृती ही काही नवी नाही. पूर्वी हे प्रमाण तुरळक होते. समाजाच्या भीतीपोटी ते लपून-छपून केले जात होते. पण आज त्याला इंडस्ट्रीमध्ये मान्यता असल्यामुळे ते प्रचलित झाले आहे इतकेच. केवळ चित्रपटसृष्टीला नव्हे तर ड्रग्जने तरुणाईलाही विळखा घातला आहे, हीदेखील चिंतेची बाब आहे. एक तर ते सहजासहजी हातात पडते, शिवाय अमली पदार्थांच्या पुरवठय़ाची साखळी चीन, पाकिस्तान, कोलंबिया, थायलंडपर्यंत पोहोचली आहे. बॉलीवूडमधील काही जाणकारांच्या मते जर काम मिळण्याबाबत तुम्ही योग्य व्यक्ती, योग्य अभिनेता-अभिनेत्री किंवा योग्य निर्मात्यासोबत ड्रग्जची कंपनी दिली तर तुम्ही लगेच त्यांच्या कंपूत शिरता. जशी टेबलावरची ‘मद्यमैत्री’ गाढ समजली जाते त्याप्रमाणे ड्रग्जसोबत कंपनी दिल्यामुळे तुमचे स्निग्ध संबंध तयार होतात. संधी लगेच मिळते. या क्षेत्रात करिअरसाठी प्रवेश केलेले व प्रवेश करू इच्छिणारा तरुणवर्ग याकडे शॉर्टकट म्हणून पाहतो, हे धोकादायक आहे. बॉलीवूडमध्ये नियंत्रणाबाहेर जाणारी ड्रग्जसंस्कृती ही निषेधार्हच आहे. कारण समाजात सर्वाधिक आकर्षण सिनेकलाकारांचे असते. त्यांचे अनुकरण केले जाते. त्यामुळे हा धोका बॉलीवूडपुरता मर्यादित नसून संपूर्ण समाजालादेखील आहे, हे विसरता येणार नाही. परंतु बॉलीवूड ड्रग्ज कनेक्शनची दाहकता दाखविण्यासाठी जी भाषा वापरली जात आहे, तिची पातळी सांभाळायला हवी. सध्या जया बच्चन, उर्मिला मातोंडकर यांच्याबरोबर कंगनाचे वाप्युद्ध सुरू आहे. ते पुढे सरकत राहील, तशी त्याची पातळी घसरत जाणार हे दिसत आहे. यावर कहर सोशल मीडियाने केला असून ऐकीव, सत्य, अर्धसत्य माहितीवर आधारित व्हीडिओ व्हायरल होत आहेत. परिणामी हिंदी फिल्मसृष्टीतील निगडित व्यक्तीभोवती गलिच्छपणाचा पडदा आहे की काय असे सर्वसामान्यांना वाटू लागले आहे. यापूर्वी सामान्य लोकांना स्टार कलाकारांच्या खाजगी आयुष्याबाबत कुतूहल होते. पण ते फारसे डोकावत नव्हते. पण सोशल मीडियामुळे ते आता न्यायाधीश बनले आहेत. त्यातच चित्रपटसृष्टीतील जबाबदार व्यक्तींची बेजबाबदार विधाने त्याला कारणीभूत ठरत आहेत. संपूर्ण चित्रपटसृष्टीच नशेबाज आहे असा जो समज उभा केला जात आहे तेदेखील चुकीचे आहे. अखेर बुद्धी आणि श्रमाला योग्य किंमत देणारा कोणताच उद्योग, व्यवसाय वाईट नसतो,त्याला चित्रपटसृष्टीही अपवाद नाही. भुरळ पाडणाऱया या बॉलीवूडच्या जगात अभिनय कौशल्य व बुद्धिमत्तेsच्या जोरावर आपले आगळे स्थान निर्माण करणारे काही दिग्गज कलावंत आहेत, हे नाकारून चालणार नाही. त्यामुळे या उद्योगातील सर्वांनाच एका तराजूत तोलणे अन्यायाचे होईल. त्याचबरोबर या सृष्टीला लागलेल्या ड्रग्जच्या किडीचे उच्चाटनही महत्त्वाचे.
FILE- In this May 30, 2017 file photo, Bollywood actor Sushant Singh Rajput speaks during a press conference to promote his movie "Raabta" in Ahmadabad, India. Rajput was found dead at his Mumbai residence on Sunday, Press Trust of India and other media outlets reported. (AP Photo/Ajit Solanki, File)







