पोलिसांचा इशारा : राज्यात आजपासून 14 दिवस लॉकडाऊन
प्रतिनिधी / बेंगळूर
कोरोना नियंत्रणासाठी राज्यात सोमवारपासून 14 दिवसांचा लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. त्यामुळे रविवार मध्यरात्रीपासूनच आंतरजिल्हा वाहतूक बंद होणार आहे. कोरोनाकाळात नागरिकांनी आपला जीव वाचविण्याला प्रथम प्राधान्य देत सरकारने जारी केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच पोलिसांना सहकार्य करावे. अन्यथा घरातून बाहेर पडत नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा ज्येष्ठ पोलीस अधिकाऱयाने दिला आहे.
सोमवारपासून कोणत्याही कारणास्तव आपली वाहने रस्त्यावर आणू नका. आदेशाचे उल्लंघन केल्यास वाहने जप्त केली जातील. केवळ अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली असून खासगी वाहनांच्या वर्दळीवर प्रतिबंध घालण्यात आले आहेत. राज्यात कोरोना नियंत्रणासाठी 28 एप्रिलपासून जारी करण्यात आलेला कोरोना कर्फ्यू अयशस्वी ठरला आहे. त्यामुळे आजपासून कठोर लॉकडाऊन जारी केला केला आहे. अनावश्यक रस्त्यांवर फिरणाऱयांना पोलीस अटक करण्याचीही शक्यता आहे.
लॉकडाऊन यशस्वी होण्यासाठी बेंगळूरसह राज्यभरात पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रमुख रस्ते, उड्डाण पूलांवर बॅरिकेड्स लावण्यात आले असून रस्त्यावर फिरणाऱया प्रत्येकांची पोलीस चौकशी करणार आहेत. आजपासून आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठीही वाहनांचा वापर करण्यास परवानगी नाही.









