तालुका पंचायतमध्ये आयोजन : श्रीधर सरदारकडून अधिकाऱयांना प्रशिक्षण
प्रतिनिधी / बेळगाव
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अनेक घरांची कामे अर्धवट राहिली आहेत. याचबरोबर काही अधिकाऱयांनी या घरांचा सर्व्हेही केला नाही. त्यामुळे ही घरे आता दुर्लक्षित झाली असून याकडे लक्ष देऊन ही अर्धवट असलेली घरांची कामे पूर्ण करण्यासाठी तातडीने पाऊल उचलण्यासाठी तालुका पंचायतमध्ये संबंधित अधिकाऱयांना प्रशिक्षण देण्यात आले. तालुका पंचायतमधील अधिकारी श्रीधर सरदार यांच्याकडून हे प्रशिक्षण देण्यात आले.
तालुका पंचायतीच्या महात्मा गांधी सभागृहात हे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी सरदार यांनी प्रत्येक ग्राम पंचायतीमध्ये 2016-17 व 2017-18 सालातील प्रधानमंत्री आवास योजना राबविली होती. मात्र, ही योजना प्रभावीपणे राबविण्यात आली नाही. अनेक घरांची नोंद झाली नाही, तर अनेक घरांची कागदपत्रे अर्धवट राहिली आहेत. त्यामुळे आपल्या स्वप्नातील घरे बांधण्यास अडचणी निर्माण होत आहेत.
तालुक्मयातील 59 ग्राम पंचायतींमधील एकाही ग्राम पंचायतीने ही कामे पूर्ण केली नाहीत. त्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रत्येक ग्राम पंचायतमधील तपासणी करण्यात यावी. जी घरे अर्धवट राहिली आहेत ती पूर्ण कशी होणार, याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. याचबरोबर ज्यांची कागदपत्रे अथवा जीपीएसमध्ये जी घरे बसली नाहीत त्यांची नोंद तातडीने करावी, असे आवाहनही श्रीधर सरदार यांनी केले. ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात जर प्रत्येकाने आपले काम योग्य प्रकारे पार पाडले तर अशा समस्या उद्भवत नाहीत. प्रत्येक घरांचा सर्व्हे करून तसेच कोणती घरे अर्धवट आहेत त्याची सर्व माहिती गोळा करून आपल्याकडे द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. यावेळी श्रीधर देसाई, मायाप्पा बनरोळी, जीनत मोमीन यांच्यासह इतर ग्राम पंचायतमधील अधिकारी उपस्थित होते.