हातावर पोट असणाऱया कामगारांची दयनीय अवस्था : निवारा केंद्रात केले दाखल
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना नियंत्रित करण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाला असला तरी त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. प्रामुख्याने हातावर पोट असणाऱया कामगारांची अवस्था दयनीय होत आहे. अशाच प्रकारची एक घटना बुधवारी घडली. घरभाडे न भरल्याने घरमालकाने आई आणि तिच्या मुलाला घराबाहेर काढले. त्यामुळे कोठे आश्रय घ्यावयाचा, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, शांता लक्ष्मण सावंत आणि त्यांचा मुलगा मंजुनाथ हे दोघेही जोशी गल्ली शहापूर येथे एका भाडय़ाच्या घरात राहत होते. मंजुनाथ एका दुकानात कामाला होता. परंतु लॉकडाऊनमुळे सध्या त्याचे काम थांबले आहे. त्याशिवाय त्याच्या आईच्या पायावर शस्त्रक्रिया झाल्याने त्याही दवाखान्यात दाखल होत्या. या सर्व परिस्थितीत घरभाडे भरणे त्यांना शक्मय झाले नाही. परिणामी घर मालकाने बुधवारी माय लेकरांना घराबाहेर काढले.
अशा परिस्थितीत कोठे जायचे, या विचारात असाहाय्य अवस्थेत ते मायलेक शहापूर बसवेश्वर सर्कल येथील एका दुकानाच्या कट्टय़ावर बसले होते. त्यावेळी म. ए. युवा समितीचे कार्यकर्ते अहमद राज मोहम्मद रेशमी व मदन बामणे यांनी त्यांची विचारपूस केली. त्याचवेळी महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील हे तिथून जात असताना त्यांनीही यामध्ये लक्ष घातले. तसेच स्वतः पुढाकार घेऊन शांता सावंत आणि त्यांच्या मुलाला जुने बेळगाव येथील निवारा केंद्रात दाखल करण्यास घेऊन गेले. यावेळी प्रारंभी निवारा केंद्रातील कांही लोकांनी कोरोना प्रादुर्भावाचे कारण सांगून नकार दिला. तथापि, संजय पाटील यांनी आपली आणि आपल्या वरि÷ांची ओळख सांगून त्या दोघांना आश्रय केंद्रात दाखल केले.









