प्रतिनिधी / रत्नागिरी :
लॉकडाऊनमुळे दिड महिन्यांहून अधिक काळ बंद असलेली दारू विक्री सुरू करताना दुकानांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने ऑनलाईन दारू विक्री करण्याबाबतचा आदेश काढला. मात्र अवघ्या चार तासांतच हा निर्णय बदलण्याची वेळ आली. आता जिल्हय़ातील मद्य विक्री दुकानांवर योग्य ते नियम आणि निकष पाळून सीलबंद दारूची विक्री करण्याचे नवीन आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी काढले आहे. यामुळे तळीरामांना दिलासा मिळाला आहे.
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे अन्य दुकानांबरोबरच दारू दुकानेही बंद होती. मात्र, मद्य विक्रीतून मिळणारा महसूल लक्षात घेऊन लॉकडाऊनच्या तिसऱया टप्प्यात मद्य विप्री करण्यास सरकारने मुभा दिली आहे. त्यानुसार राज्यातील काही जिल्हय़ांमध्ये मद्यविक्री दुकाने सुरू झाली. मात्र त्याठिकाणी तळीरामांची प्रचंड झुंबड उडाले, अनेक ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्या, सोशल डिस्टन्सींगचाही काही ठिकाणी फज्जा उडाला होता.
त्यामुळे रत्नागिरी जिल्हय़ात सबुरीचे धोरण स्वीकारण्यात आले होते. मात्र मद्य विक्री सुरू न झाल्यास शासनाला मोठय़ा महसुलाला मुकावे लागत असल्याने अखेर मात्र यात शासनाचा महसूल बुडत असल्याने अखेर दारूच्या घरपोच विक्रीचा पर्याय पुढे आला. काही राज्यांनी ही योजना सुरू केल्याने रत्नागिरीतही ऑनलाईन नोंदणीद्वारे मद्य विक्रीचे आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी बुधवारी सायंकाळी काढले. मात्र अवघ्या चार तासांमध्येच रात्री हा ऑनलाईन मद्यविक्री आदेश रद्द करत नवा आदेश त्यांनी काढला. सोशल डिस्टस्टींगचे काटेकारेपणे अंमलबजावणी करून सीलबंद मद्य विक्रीला परवानगी देण्यात येत असल्याने नव्या आदेशाद जिल्हाधिकारी मिश्रा यांनी नमूद केले आहे.
बुधवारी सायंकाळी घरपेच दारू विक्रीबाबत जिल्हाधिकाऱयांनी काढलेला आदेश विशेष चर्चेत आला होता. छत्तीसगढमध्ये अशा प्रकारची योजना सुरू असून त्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळवणे शक्य असल्याचे प्रशासनाला वाटत होते. हा आदेश अंमलात आला असता तर अशा प्रकारचा निर्णय घेणारा रत्नागिरी हा पहिला जिल्हा ठरण्याची शक्यता होती.
मात्र ऑनलाईन नोदणीबाबत तळीरामांमधील संभ्रमावास्था, त्यांना येऊ शकणाऱया अडचणी, शिवाय कायद्यातील तरतुदींचा विचार करून जिल्हाधिकारी मिश्रा यांनी बुधवारी रात्री काढलेला घरपोच मद्य विक्रीबाबतचा आदेश चार तासांतच रद्द केला. त्यानंतर पुन्हा नवीन आदेश पारित केले. या आदेशानुसार नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून सीलबंद दारू विक्री करण्यात यावी नियम न पाळल्यास गुन्हा दाखल करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी पोलीस अधीक्षकांना दिल्या आहेत.









