वार्ताहर /घटप्रभा :
जिल्हय़ातील महत्त्वाचे असलेल्या घटप्रभा रेल्वे स्थानकावर गेल्या वर्षभरापासून ओव्हरब्रिज निर्मितीचे काम सुरू आहे. मात्र सदर काम संथगतीने सुरू असल्याने प्रवाशांना प्लॅटफार्म ओलांडताना जीव धोक्यात घालावा लागत आहे. यामुळे संताप व्यक्त होत असून रेल्वे प्रशासन याकडे लक्ष देणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
मिरज-बेळगाव या रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यापैकी घटप्रभा रेल्वेस्थानक ते चिकोडी रोड या मार्गाचे दुपदरीकरण होऊन त्याचे लोकार्पण नुकतेच केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते झाले. मात्र मंत्री महोदयांनी यावेळी येथे सुरू असलेल्या रेल्वे ओव्हरब्रिजच्या कामाची पाहणी न करता उद्घाटनानंतर लगेचच निघून जाणे पसंत केले. या रेल्वे स्थानकावर दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असते. सध्या येथे चार मार्ग आहेत.
यामध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरुन 2 वर जाताना रेल्वेमार्ग ओलांडून प्रवाशांना जावे लागत आहे. वास्तविक रेल्वेमार्ग ओलांडणे हा गुन्हा आहे. मात्र ओव्हरब्रिज नसल्याने हा गुन्हा प्रवाशांना दररोज करावा लागत आहेत. दुहेरीकरणामुळे येथे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर मालगाडी थांबली असल्यास व त्याचवेळी प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर दुसरी रेल्वेगाडी थांबल्यास अशावेळी प्रवाशांना धावपळ करून सुमारे 1 किलोमीटर अंतरापर्यंत मालगाडीला वळसा घालून प्लॅटफॉर्म क्रमांक 2 ची रेल्वे पकडावी लागत आहे.
येथे रेल्वे ओव्हरब्रिजचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. मात्र येथे केवळ दोन्ही प्लॅटफॉर्मवर लोखंडी ओव्हरब्रिजचा सांगाडा उभा करण्यात आला आहे. यानंतर पेनद्वारे होणारी सांगाडय़ाची जोडणी अद्याप झालेली नाही. पेन उपलब्ध असूनही उर्वरित काम रखडले आहे. त्यामुळे प्रवासी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत असून याची दखल घेऊन ओव्हरब्रिजचे काम गतीने पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.









