ज्यांचे पैसे त्यांचा घेतला जातोय कचरा : तक्रार करणाऱयाचा कचराच उचलला जात नाही : सातारा शहरातील प्रकार
प्रतिनिधी / सातारा
सातारा शहरात दररोज तयार होणारा सात टन कचरा हा गोळा करण्यासाठी चौदाव्या वित्त आयोगातून 40 घंटागाडय़ा घेतल्या गेल्या. मात्र या घंटागाडय़ाची अवस्था बिकट अशी झालेली असून त्यातील काही घंटागाडीचे कर्मचारी हे चांगलेच सोकावलेले असून जे व्यावसायिक, सातारकर ठराविक रक्कम देतील त्यांचा कचरा नियमित नेतात. त्यांच्याच घंटागाडीत अगोदरच कचरा भरुन पार्किंगमध्ये गाडी लावण्याचा धक्कादायक प्रकार रविवारी निदर्शनास आला.
सातारा शहरातील घंटागाडी ठेकेदाराचे कसे दुर्लक्ष आहे. नुसताच नावाला ठेका घ्यायचा अन् व्यवस्थापन योग्य पद्धतीने चालवायचे नाही याच्या अनेक तक्रारी सातारकरांनी सातारा पालिकेकडे केलेल्या आहेत. सातारकरांनाही अनेकदा त्याचा अनुभव आलेला आहे. अगदी सातारा शहरातील कचरा गाडी ही हद्दीबाहेरचा कचरा गोळा करण्यासाठी जात असल्याची पकडण्यात आली होती. तरीही पुन्हा येरे माझ्या मागल्या प्रमाणे काही सोकावलेल्या घंटागाडी चालकाचे काम सुरुच आहे. शहरातील काही भागात कचरा गोळा करण्यासाठी पैसे मागण्याचा उपक्रम काही घंटागाडी चालकांकडून सुरु आहे. ज्यांच्याकडून पैसे मिळतात त्यांचाच कचरा नियमित गोळा करायचा. अगदी हाक मारुन घरातील कचरा न्यायचा. आणि जो पैसे देत नाही. तक्रार करतो त्या नागरिकांना वेगवेगळी कारणे सांगून कचरा तसाच ठेवून त्रास द्यायचे असा कार्यक्रम सध्या सातारा शहरात सुरु आहे. पार्किंगमध्ये लावलेल्या घंटागाडीत अगोदरच कचरा भरुन ठेवून सकाळी तीच गाडी पुन्हा सोनगाव कचरा डेपोत तशीच पळवत नेण्याचे काहींचे प्रकार सुरु आहेत. जीपीआरएस यंत्रणा असली तरीही या घंटागाडी चालकांनात् त्यातूनही पळवाट काढता येते, अशी जोरदार चर्चा आहे.