वृत्तसंस्था/ ओस्लो
येथे झालेल्या 210,000 अमेरिकन डॉलर्स एकूण बक्षीस रकमेच्या ओस्लो ई-स्पोर्ट्स चषक ऑनलाईन जलद आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रॅण्डमास्टर आर. प्रज्ञानंदला सातव्या आणि शेवटच्या फेरीमध्ये पराभव पत्करावा लागल्याने तो या स्पर्धेत चौथ्या स्थानावर राहिला. या स्पर्धेचे अजिंक्मयपद पोलंडच्या ग्रॅण्डमास्टर ख्रिस्तोफ डुडाने पटकाविले.
या स्पर्धेतील सातव्या आणि शेवटच्या फेरीत हॉलंडच्या ग्रॅण्डमास्टर अनिश गिरीने आर. प्रज्ञानंदचा 2.5-0.5 अशा गुणांनी पराभव केला. या स्पर्धेत पाचव्या फेरीपर्यंत 16 वषीय प्रज्ञानंद आघाडीवर होता. शेवटच्या 3 लढतीत तो मागे पडला. या स्पर्धेच्या सहाव्या फेरीत पोलंडचा ग्रॅण्डमास्टर डुडाने प्रज्ञानंदचा 2.5-0.5 असा पराभव केला. पोलंडच्या डुडाने या स्पर्धेचे अजिंक्मयपद पटकाविताना 14 गुण घेतले. भारतीय ग्रॅण्डमास्टर प्रज्ञानंद 12 गुणांसह चौथ्या स्थानावर राहिला. व्हिएतनामचा ग्रॅण्डमास्टर लियेम ली याने 13 गुणांसह दुसरे स्थान तर नॉर्वेचा ग्रॅण्डमास्टर मॅग्नस कार्लसनने 12 गुणांसह तिसरे स्थान पटकाविले.









